‘कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात द्या’, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या दरम्यान जमावाने दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. अटक करतांना गोंधळ घालणाऱ्या या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांसह सात-आठ जण जखमी झाले. या घटनेमुळे त्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आकाशवाणीजवळील रस्त्यावर भुरूचा अक्कू होता होता मात्र वाचला.
गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला रात्री संतप्त जमावाने पाठलाग करून कुख्यात आरोपी भुरू उर्फ शेख अक्रम शेख रहेमान (रा. आनंदनगर) याच्या भावाला ठेचून ठार केले होते. त्या दिवशी रात्री पाठलाग करणाऱ्या जमावाला गुंगारा देत भुरू धावत थेट सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिरला तेव्हापासून तो कारागृहात आहे. या प्रकरणी न्यायालयात आज दहा-बाराजणांची साक्ष होती. त्यासाठी वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील सातशे-आठशे स्त्री-पुरुषांचा जमाव जिल्हा न्याय मंदिर परिसरात आला होता. या परिसरात तैनात पोलिसांनी या नागरिकांना न्यायालय परिसराबाहेर जाण्यास सांगितले. यावेळी तेथे जमावाने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी बळेबळे जमावाला बाहेर काढले. दोन-चार भुरूच्या समर्थकांना थांबू दिले. याच कारणावरून तेथे वाद झाला. यावेळी पोलिसांनी दोन महिलांना मारहाण केल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला.
न्यायालय परिसराबाहेर आल्यानंतर या जमावाने दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास आकाशवाणी चौक ते जीपीओ मार्गावरील वाहनांवर दगडफेक केली. एका कारला अडवून तुफान दगडफेक केली. कारच्या समोरील काचेचा चुराडा झाला. दोन-तीन वाहनांचे तुरळक नुकसान झाले. त्यानंतर जमावाने न्यायालयाच्या फाटकासमोर ठाण मांडून रस्ता अडवून धरला. या घटनेने त्या परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. पोलीस उपायुक्त मंगलजित सिरम, कैलास कणसे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप धरमसी, सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजरत्न बन्सोड, गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक पांडुरंग ठोंबरे यांच्यासह तिन्ही ठाण्याचे पोलीस, तसेच नियंत्रण कक्षातून राखीव पोलीस ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आकाशवाणी व जीपीओ चौकाकडून रस्ता वाहनांसाठी बंद केला. तोपर्यंत आरोपी भुरूसह चार आरोपींना न्यायालयात आणल्याचे समजताच न्यायालयाच्या फाटकासमोर ठाण मांडलेला जमाव संतापला. ‘भुरूला फाशी द्या’, ‘भुरूला ताब्यात द्या’, अशी मागणी करीत हा जमाव न्यायालय परिसरात शिरण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास भुरूसह चार आरोपींना दुसऱ्या बाजूने पोलीस कारागृहातनेत असल्याचे समजताच जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने धावला, मात्र तोपर्यंत आरोपींचे वाहन निघून गेले. त्यामुळे जमाव संतापला. तो हा जमाव धावतच मागे फिरला. आकाशवाणी चौकात एका स्टार बसवर दगडफेक केली. पोलीस जमावाच्या मागे धावले. जमाव धावत पुन्हा न्यायमंदिराच्या दक्षिणेकडील फाटकासमोर गेला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास तेथे पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. यावेळी जमावाने गोंधळ घालणे सुरू केले. ‘हनुमान सेना जिंदाबाद’च्या घोषणा देत गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी काठय़ांचा प्रसाद दिला. जमावातून पाण्याची बाटली, तसेच दगड भिरकावणे सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. जमाव पळू लागला तसे पोलीस त्यांच्या मागे धावले. पोलिसांनी जो दिसेल त्याच्यावर सपासप काठय़ा चालवल्या. काठय़ांचा तसेच काठय़ा खाणाऱ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. जमावाने रस्त्याच्या कडेला असलेली वाहने उलथवून टाकली. हाती लागेल त्याच्यावर सपासप काठय़ा चालवून पोलीस त्यांना ओढत वाहनात ढकलत होते.
हा जमाव पळत करोडपती गल्लीत शिरला. पोलीस जमावाच्या मागे धावले. जमावाने त्या गल्लीत उभ्या वाहनावर तुफान दगडफेक केली. तेथे उभ्या पोलिसांच्या जीपवरही (एमएच/३१/एजी/९७४२) जमावाने सर्वाधिक संताप काढला. यावेळी गाडीत बसलेली एक महिला शिपाई थोडक्यात बचावली. या गल्लीत जमावाने चार वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिसांनी थेट वसंतराव नाईक झोपडपट्टीपर्यंत जमावाला पिटाळले. दगडफेक व लाठीमारात सात-आठजण जखमी झाले. त्यात दोन-तीन पोलिसांचाही समावेश आहे. पोलिसांनी जमावातील सुमारे दोनशे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चंद्रकांत गोपाल कुंभारे (रा. इतवारी) याच्यासह वीस आरोपींना सदर पोलिसांनी अटक केली. त्यात बारा महिलांचा समावेश आहे.
नागपुरात न्यायमंदिरासमोर जमावाची दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या
‘कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात द्या’, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या दरम्यान जमावाने दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. अटक करतांना गोंधळ घालणाऱ्या या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
First published on: 05-03-2013 at 03:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone attack by group in frount of nagpur court