बुद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात काल सायंकाळी व आज दुसऱ्या दिवशी किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. यात एका सिटी बससह पाच वाहनांची मोडतोड करण्यात आली. तसेच काही दुकानांवरही दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. त्यामुळे संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कुमठा नाका-माधवनगर येथे सत्तर फूट रस्त्यावर सायंकाळी अचानकपणे काही समाजकंटकांनी जमाव करून वाहनांवर दगडफेक केली. यात विठोबा बसण्णा मैले (वय ३९, रा. माधवनगर) यांच्या मोटारसायकलसह इतरांची मारुती व्हॅन, छोटा हत्ती, टेम्पो आदी वाहनांची तोडफोड झाली. समाधान धांडोरे यांच्या मारुती व्हॅनमधून समाजकंटकांनी २३ हजारांची रोकड लुटून नेली. तसेच रस्त्यावरील किराणा दुकान, बेकरी व खासगी कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले होते, दरम्यान, पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दगडफेक करणाऱ्यांपैकी दीपक विलास पाचकवडे, बाबा तळभंडारे, सुनील माने, झिपऱ्या व अन्य एकाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याशिवाय बाळीवेस भागात महापालिकेच्या सिटी बसवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बसचे बरेच नुकसान झाले. मात्र यात कोणीही जखमी झाले नाही. बसचालक राजेंद्र मोहन आलवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ सूर्यकांत चिकनगार्ड (रा. उत्तर कसबा) यास फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर नव्या पेठेतही दगडफेक करून व्यापार बंद पाडण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. या भागात पाच-सहा दुकानांना लक्ष्य करून दगडफेक करण्यात आली. तसेच सोडा बाटल्या फेकण्यात आल्या. या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून बाजारपेठ पूर्ववत सुरू आहे.
बुद्धगया बॉम्बस्फोटानंतर सोलापुरात किरकोळ दगडफेक
बुद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात काल सायंकाळी व आज दुसऱ्या दिवशी किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. यात एका सिटी बससह पाच वाहनांची मोडतोड करण्यात आली.
First published on: 09-07-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stoning in solapur after buddhagaya bomb blast