विक्रमनगरमधील शाळेचे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी दगडफेक केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवले. त्यानंतर तेथील अतिक्रमण पथकाने काढून टाकले.
विक्रमनगरमध्ये करवीर प्रशाला ही शाळा सुरू आहे. या शाळेने महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले होते. अतिक्रमण काढण्याबाबत संस्थेला महापालिकेकडून सूचनाही केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक या शाळेजवळ पोहोचले. त्यांनी डंपर वाहनाच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्याची तयारी सुरू केली. या हालचाली दिसल्यावर शाळेविषयी आस्था बाळगणाऱ्या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध दर्शविला.
मात्र महापालिकेच्या पथकाने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यास विरोध दर्शवत नागरिकांकडून दगडफेक सुरू झाली. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी दगडफेक करणाऱ्या जमावावर लाठीमार सुरू केला. त्यामुळे जमाव पांगला गेला. तेथे शांतता निर्माण झाल्यानंतर अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली.
अतिक्रमण निर्मूलन पथकावर कोल्हापुरात दगडफेक
विक्रमनगरमधील शाळेचे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी दगडफेक केली.
First published on: 08-06-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stoning on trespassing eradicate unit in kolhapur