महामार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे कामामुळे कामोठेवासीयांना बस थांबा गाठण्याचे दिव्य पार करावे लागते. याच मार्गावर असलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या खालून जिवघेण्या मार्गातून बसथांबा गाठताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून या मार्गावरून मार्गक्रमण करताना कोकणातील साकव पार करण्याची आठवण प्रवाशांना करून देत आहे. पावसामुळे या अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरून थेट कामोठे वसाहतीमध्ये जाणारा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कामोठे येथील प्रवाशांना मुंबईकडे जाणारी बस पकडण्यासाठी चालत अर्धा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. कळंबोलीकडून कामोठेकडे उड्डाणपुलाखालून जाणारा मार्गही नाही. पुलाखालच्या नाल्याच्या शेजारून दोन फुटांचा भराव टाकून त्यावर कसेबसे नागरिक रस्ता ओलांडतात. एका वेळी तीन जण यावरून जाण्याचा विचार केल्यास एखाद्याचा पाय घसरल्यास ती व्यक्ती पंधराफुट खोल खड्डयात पडण्याची भीती येथे प्रवाशांना लागली आहे. विजेची कोणतीही सोय नसल्याने येथे पसरलेल्या अंधारात महिलांना धक्के मारणाऱ्यांचे यामुळे फावत आहे. उड्डाणपुल कंत्राटदाराने  वाहतकीसाठी खुला केला आहे.
मात्र पुलाखालून पायी चालणाऱ्यांचे हाल प्रशासनापर्यंत पोहचत नाहीत. वाहतूक पोलिसांनी यामधून चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पुलाखालून तात्पुरता मार्ग काढला आहे. परंतु रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने येथे काही वाहने रस्त्याखाली गडगडतात. सायन-पनवेल मार्गावरून थेट कामोठे वसाहतीमध्ये जाणारा मार्ग अजूनही खुला केला गेला नसल्याने ही कोंडी अजून काही दिवस होणार असल्याचे स्पष्ट आहे.
याचा परिणाम म्हणजे कळंबोली शिवसेना शाखेशेजारील लहान उड्डाण पुलाखाली रोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते. याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांच्याशी संपर्क साधला असता, कामोठे सिग्नल आणि शिवसेना शाखा येथे दोन पोलीस कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक नियमनासाठी तैनात केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे. 

Story img Loader