पेरणीसाठी पीककर्ज घेण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांची राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून हेळसांड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा हा त्रास दूर करून त्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
परिसरात काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. रासायनिक खते व बी-बियाणे खरेदीकरिता शेतकरी बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. मागील कर्ज फेडण्यासाठी पन्नास हजारांपर्यंत कोणतेही व्याज आकारू नये, अशा शासनाच्या सूचना असूनही कर्ज घेतलेल्या रकमेवर ७ टक्के व्याज घेण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांना ना-हरकत प्रमाणपत्रासाठी त्रास सहन करावा लागत आहे, तसेच काही शेतकऱ्यांना एकरी ४ हजार, तर काहींना एकरी १५ हजार एवढे कर्ज देण्यात येत आहे.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया चिखली शाखेत एकाच खिडकीवर देण्या-घेण्याचे कामकाज चालते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. साठ वर्षांवरील वृध्दांना दोन दोन तास रांगेत उभे राहावे लागते. या संदर्भात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची कारणे दिली जात आहेत, तसेच पुनर्गठणाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही गैरसोय दूर करून तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विष्णुपंत पाटील, डॉ.सुरेश बाठे, अशोक चिंचोले, अशोक गायकवाड रमेश काकडे, शिवसिंग जाधव, गजानन होने, सिध्दार्थ जमधाडे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा