वीज गळती, भ्रष्टाचार व कार्य करण्याची उदासीनता यामुळे महाराष्ट्रात सतत ग्राहकांवर वीज दरवाढ लादली जात आहे. ऑगस्ट २००९ ते फेब्रुवारी २०१४ या काळात १३ वेळा वीज दरवाढ लादण्यात आली आहे. अशा पद्धतीने वीज दरवाढ लादणे बंद करा, अशी मागणी जन संग्राम फाऊंडेशनच्या वतीने  निवेदनात करण्यात आली.
यावेळी जन संग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष परिणय फुके, जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, आर.बी. गोयंका, रवि वाघमारे, किशोर भांदककर, मयंक शुक्ला, विठ्ठलदास तापडिया, सचिन डोये, आशीष मनकवळे प्रामुख्याने उपस्थित होते. वीज दरवाढ करत असताना आयोगाची भूमिका महत्त्वाची असते. खर्चावर मर्यादा आणण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर तिप्पट आहे. याचा त्रास सामान्य ग्रहकांना होत आहे. २०१२-१३ मध्ये औद्योगिक वीज वापर कमी झाल्याचे स्वत: कंपनीने जाहीर केले आहे. महावितरण केवळ थातूरमातूर कारवाई करून ग्राहकांना त्रास देत आहे. महावितरण त्यांच्याकडून होणारी वीज गळती लपवत आहे. शेतीपंपाचा वीज वापर दुप्पट दाखवून लबाडी करत आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.