सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीचे वर्ग सुरू झाले असून त्या सर्व वर्गाची पटपडताळणी करा व ज्या कनिष्ठ महाविद्यालयात किमान ८० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत, अशाच महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाठवा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली आहे.
जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वाखाली उपसंचालक करजगावकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने खाजगी शिकवणी वर्गानी शहरात घातलेल्या गोंधळाचे सविस्तर वर्णन केले. ज्या महाविद्यालयांनी बारावीमध्ये विद्यार्थ्यांना येण्याची गरज नाही अशी सूट देऊन खाजगी शिकवणी वर्गासोबत हातमिळवणी केली, अशा महाविद्यालयात विद्यार्थी जात नाहीत. त्यामुळे प्रथम नामांकित शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयात जाऊन पटपडताळणी करा व जेथे बारावीचे वर्ग नियमित सुरू असून समाधानकारक उपस्थिती आहे, तेथेच केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीचे प्रवेश पाठवा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील दलालांनी खाजगी शिकवणी वर्ग व कनिष्ठ महाविद्यालयाची अभद्र युती घडवून आणल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यायात विद्यार्थी येत नाहीत, त्यांची मान्यता रद्द करून ज्या शिक्षण संस्था असे महाविद्यालय चालवण्यास तयार आहेत त्यांना ही माहाविद्यालये द्या, अशी मागणी शेखर सावरबांधे यांनी केली आहे.
शिष्टमंडळात गटनेत्या शीतल घरत, सभापती मंगला गवरे, जगतराम सिन्हा, अनिल नगरारे, कुसुम शिंदेकर, नंदू थोटे, प्रवीण गवरे, दीपक अदमने, संजू मोहरकर, रजत देशमुख, मंगेश ठाकरे, शंकर बेलखोडे, राजू भुरे, वसंता आष्टनकर, राकेश मासूरकर, श्याम तेलंग, अशोक अंतुरकर, ज्योती गेडाम, प्रवीण काकडे, सुनील बिडवाईक, अरविंद यादव, विजय तलवारे यावेळी उपस्थित होते.

Story img Loader