गेल्या काही दिवसांपासून चिखलीत सुरू करण्यात आलेली नवीन मीटर मोहीम तत्काळ थांबविण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख नीलेश अंजनकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी संतप्त महिलांनी शाखा अभियंत्यास घेराव घालून बांगडय़ांचा आहेर दिला. शिवसेनेच्या या अघोषित आंदोलनामुळे महावितरण कार्यालयात खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने शहरातील ग्राहकांचे वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्याचा सपाटा सुरू केला आहे. या नवीन मीटरचे बिल जास्त येत असल्यामुळे बिल भरावे की, कुटुंबांचा उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. त्यामुळे ही मोहीम तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलनसुद्धा केले होते. परंतु, महावितरणने मीटर बदलविणे सुरूच ठेवले आहे. या विरोधात बुधवारी शहरप्रमुख नीलेश अंजनकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अभियंता यादव यांना घेराव घातला. त्यानंतर संतप्त महिलांनी त्यांना बांगडय़ांचा आहेर दिला. या वेळी महिलांनी महावितरणच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर अंजनकर यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकारी शेगोकार यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत बोलून जुन्या आणि नव्या मीटरच्या बिलांमधील तफावत पाहिल्यानंतर मीटर बदलण्याचा निर्णय मागे घेण्यात येईल, असे सांगितले. या आश्वासनानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, महिलांनी घेराव घातल्यामुळे अभियंता यादव यांची चांगलीच तारांबळ उडाली. या वेळी कार्यालयातील पाच महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेजारी सुरक्षाकडे तयार केले होते. या आंदोलनात तालुकाप्रमुख अर्जुन नेमाडे, रोहित खेडेकर, शकुंतला अंजनकर, स्वाती पांडे, यश चोपडा, विठ्ठल जगदाळे, पन्नालाल शिंगणे, दत्ता सुसर, शुभम खरपास, अक्षय पवार, बापू देशमुख, मुन्ना पांडे, राम काचोळे, गणेश पाटील, पवन पाटील, अमोल शिराळ, राजू शेळके, संतोष जाधव, राहुल पवार, राहुल गायकवाड यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता.

Story img Loader