पुणे कोल्हापूर महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित झाला असून  सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य झाले आहे. सातारा जिल्हयातून जाणारा महामार्ग जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत महामार्गावर टोल आकारणी करू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करून टोल वसुली बंद पाडली. यावेळी आंदोलक, रिलायन्सचे अधिकारी व टोल ठेकेदारामध्ये वादावादी झाल्याने टोल नाक्यावर तणावाचे वातावरण झाले होते.
पुणे कोल्हापूर महामार्गावरील खराब रस्त्यामुळे आजपर्यंत झालेल्या छोटय़ा मोठय़ा अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असून कित्येक जण जायबंदी झाले आहेत. अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या व जायबंदी झालेल्यांच्या बाबत सदोष मनुष्यवधाचा व इतर गुन्हे दाखत करण्याची मागणी रस्त्याच्या लगतच्या गावातून करण्यात येत होती. त्यामुळे महामार्गाबाबत जनभावना तीव्र झाल्या होत्या. सातारा जिल्हय़ातून खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शशिकांत िशदे जिल्हयातील सर्व आमदारांनी याकामी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र ठेकेदार कंपनीने वेळोवेळी वेळ मागून महामार्ग दुरुस्तीचे काम लांबविण्याचा आपला हेका कायम ठेवला होता.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, किरण साबळेपाटील यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. सकाळी अकरापासून रस्ता दुरुस्तीची जोरदार मागणी करत टोल वसुलीला विरोध केला. यावेळी आंदोलकांनी टोल वसुली बंद पाडली.  आंदोलकांशी चर्चा करताना रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणने देण्यास विरोध केला  तसेच लेखी अश्वासन दिल्यास चार महिन्यापर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करू असे सांगितल्याने वातावरण तंग झाले. त्यावेळी आंदोलकाची व अधिकाऱ्यांची वादावादी झाली. दुपारी दीड ते दोन पर्यंत आदोलन सुरूच हाते. या काळात वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र टोल आकारणी होत नव्हती. पोलिस आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याबाबत सांगत होते. मात्र आंदोलकांच्या भावना तीव्र असल्याने टोल नाक्यावरील वातावरण तणावपूर्ण झाले हाते. त्यातच टोल नाक्यावरील कर्मचारी व आंदोलकांमध्येही तणावाचे वातावरण हाते. आंदोलक टोल नाक्याची तोडफोड करण्याची श्शक्यता गृहित धरून आनेवाडी टोल नाक्याच्या ठेकेदारांनीही काळजी घेतली होती. दुपारी अडीचच्या दरम्यान पोलिसांनी डॉ. दिलीप येळगावकर, प्रकाश गवळी यांच्यासह १७ जणांना ताब्यात घेऊन भुईज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पालकमंत्री शशिकांत शिदे यांच्या मध्यस्तीनंतर सायंकाळी सर्वाना सोडून देण्यात आले. यावेळी टोल नाक्यावर ठेकेदार विकास शिदे, आंदोलक व पोलिसांमध्ये वादावादीही झाली.आंदोलन काळात टोल वसुली होऊ न शकल्याने किमान दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे टोल नाक्यावरून समजले.
    रिलायन्स कंपनीने आपल्या कामकाजात सुधारणा करावी अन्यथा मंगळवारी पुन्हा याच ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.