महाराष्ट्र आदिवासी वाल्मिकलव्य सेना जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षांकडून जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर यांच्या अंगावर त्यांच्याच दालनात शाई टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेतील तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. परिणामी, बहुतांश शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. सर्वसामान्यांची कोणतीही कामे या दिवशी झाली नाहीत.
गेल्या काही वर्षांत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे व मारहाण करणे, त्यांच्या तोंडाला काळे फासणे, अंगावर काळा रंग अथवा शाई टाकणे आदी कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे. ही बाब शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी असून त्याचा विपरित परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाज व त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी संयुक्त संघटना तसेच राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी राजुरकर यांच्या दालनात महाराष्ट्र आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे अध्यक्ष शिष्टमंडळासह निवेदन देण्याच्या उद्देशाने आले होते. दालनातच जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी राजुरकर यांच्या अंगावर तसेच टेबलावरील कागदपत्रांवर शाई टाकण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरावरील राज्य शासनाचे सर्वोच्च प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासोबत घडलेली ही घटना जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरल्याचे संघटनांनी म्हटले आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आज अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदी कठोर नाहीत, त्यासाठी प्रभावशाली कायदेशीर तरतुदींची नितांत गरज असल्याचे महासंघाने आपल्या निषेध पत्रात म्हटले आहे.
जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघ, जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी संयुक्त संघटना, जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघ, जिल्हा तलाठी संघ, जिल्हा वाहनचालक संघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा मुख्याधिकारी व नगरपरिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा कोतवाल कर्मचारी संघाने घटनेचा तीव्र निषेध करून कामावर बहिष्कार टाकला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा