मानवी वस्तींमध्ये येणाऱ्या बिबटय़ांचा वावर आणि त्यामुळे निर्माण होणारा बिबटे-मानव यांच्यातील संघर्ष थांबविणे हे आपल्याच हाती आहे. महामार्गामुळे विभागलेले जंगल पुन्हा एकत्र करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करणे, जंगलांच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा बंद करणे त्याचप्रमाणे राजकीय वरदहस्तांमुळे जंगलांमध्ये अथवा जंगलांजवळ उभ्या राहणाऱ्या मानवी वसाहतींवर निर्बंध आणणे असे उपाय आखणे आवश्यक असल्याचे मत ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ या संस्थेच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
मुंबईकर्स फॉर एसजीएनपी या संस्थेने ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१२ या काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून महाराष्ट्रातील जंगलांचा अभ्यास केला. बिबटय़ांच्या एकूण संख्येचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कॅमेऱ्यांचा वापर केला होता. त्यानुसार राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी येथे २१ बिबटय़ांचा वावर असून केवळ त्यांन पकडून अन्यत्र नेऊन सोडणे हा उपाय नसल्याचे संस्थेच्या अभ्यासक विद्या अत्रेय यांनी सांगितले. २००२-०४ या काळामध्ये बिबटय़ांचे हल्ले मोठय़ा प्रमाणात झाले असले तरी हल्ले करणारे हेच बिबटे असल्याचे स्पष्ट झालेले नाही. मानवी वस्तीमध्ये आलेले बिबटे हे सर्वच नरभक्षक नसतात, असे सांगून त्या म्हणाल्या की, बिबटय़ांना पकडून अन्यत्र हलविल्यामुळे ही समस्या वाढली होती. बिबटय़ांना अन्य वन्यप्राण्यांपेक्षा कुत्र्यांचे भक्ष्य झटपट पकडता येते आणि कुत्रे मानवी वस्तीत असतात म्हणून बिबटे त्यांना खाण्यासाठी तेथे येतात, असेही त्यांनी सांगितले. जंगलांमधून जाणाऱ्या महामार्ग अथवा रस्त्यांमुळे बिबटय़ांना अडथळा होत असून जंगलांचे भाग जोडणअयासाठी रस्त्यांखालून अथवा रस्त्यांवरून मार्ग बांधावेत म्हणजे ते मुक्तपणे वावरू शकतील. तसेच या रस्त्यांवर गतिरोधक उभारल्यास वाहनेही कमी वेगाने जातील आणि प्राण्याचे जीव वाचू शकतील, असे त्यांनी सांगितले. एकूणच वन्य प्राणी आणि प्रामुख्याने बिबटे आणि मानव यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी मानवानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा