कुलूपबंद घरांवर चोरटय़ांनी नजर असून दाराचा कडी-कोंडा तोडून अवघ्या काही वेळात घरातील माल साफ केला जात आहे. बेसा रोडवरील नरहरीनगरात रविवारी भरदिवसा अशाच प्रकारे चोरी झाली. चोरटय़ांनी सव्वालाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला.
भास्कर श्रावण मेश्राम यांच्या मुलीचे उर्वेला कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात काल लग्न होते. सर्व कुटुंब काल सकाळपासून तेथेच होते. लग्न आटोपल्यावर सायंकाळी सर्व घरी परतले. त्यांना दाराचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. घरातील आलमारीत लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, म्युझिक सिस्टीम, दोन मोबाईल, असा एकूण १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
घरफोडीची दुसरी घटना भामटी साईनाथनगरात घडली. दीपक माधव गभणे हे त्यांच्या परिवारासह शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आर्वी येथे साक्षगंधासाठी गेले. कोल रविवारी सकाळी साडेसात वाजता घरी परत आले असता दाराचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. घरातील लोखंडी आलमारीतून तसेच लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे प्याले, वाटय़ा, चमचे, ट्रे, अत्तरदाणी, गुलाबदाणी, नाणी व नगदी ५ हजार, असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जबरी चोरी
घरफोडय़ांसह लुटीच्या घडनाही घडत आहेत. अंबाझरी तलावाच्या पायऱ्यांवर असलेल्या तरुण-तरुणीला लुटल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. त्या परिसरात पोलीस फिरत असल्याने लुटारू त्यांच्या हाती लागले. शिवानी सुरेंद्रपाल चौधरी (रा. पारधीनगर) तिच्या मित्रासह पायऱ्यांवर बसली होता. सतीश रामलाल चव्हाण (रा. जुना बाबुलखेडा) हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. दरडावत त्यांनी बॅग व तिच्या पर्स हिसकावली व पळून जाऊ लागले.
रस्त्यावर पोलीस दिसताच तरुणीने आरडाओरड केली. तिने पोलिसांना हकिकत सांगितली. पोलिसांनी धावपळ करून आरोपी सतीशला अटक केली.
दोन मोटारसायकलवर आलेल्या चार लुटारूंनी एका तरुणाला मारहाण करून त्याला लुटले. रविवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील नागलोकजवळ ही घटना घडली.
आनंद राजकुमार जाटव (रा. नागलोक) हा कामठी रोडवर अंधारात मोबाईलवर बोलत होता. दोन मोटारसायकलवर चारजण आले. त्यांनी तोंडावर रुमाल गुंडाळला होता. त्यांनी आनंदला मारहाण केली.
मोबाईल, पर्स, युनियन बँकेचे एटीएम कार्ड, दोन सीमकार्ड, असा एकूण १ हजार ३२० रुपयांचा ऐवज लुटून नेला. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
सावधान.. कुलूपबंद घरांवर चोरटय़ांची वक्रदृष्टी
कुलूपबंद घरांवर चोरटय़ांनी नजर असून दाराचा कडी-कोंडा तोडून अवघ्या काही वेळात घरातील माल साफ केला जात आहे. बेसा रोडवरील नरहरीनगरात रविवारी भरदिवसा अशाच प्रकारे चोरी झाली. चोरटय़ांनी सव्वालाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला.
First published on: 15-01-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stops robbers now watch on locked home