एमएमआरडीए, वाहतूक विभागाच्या नावाने पालिकेचा शिमगा
मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत १४ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र एक वर्ष लोटले तरी पालिकेला त्यापैकी एकाही पादचारी पुलाची वीटदेखील उभी करता आलेली नाही. मोनो आणि मेट्रो प्रकल्पांची कामे, तसेच एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाचे असहकार्य यामुळे हे पादचारी पूल रखडले, असा शिमगा आता पालिकेकडून करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये महापालिकेचे ७३ पादचारी पूल आहेत. मात्र वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी तसेच काही रेल्वे स्थानकांवर पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी १४ पादचारी पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने गेल्या वर्षी घेतला होता. पादचारी पूल उभारण्यासाठी माटुंगा रेल्वे स्थानक, सायन-वांद्रे लिंक रोडवरील यलो बंगलो बस स्थानक, माहीम रेल्वे स्थानक ते माहीम फाटक, एम्पायर हाऊसजवळील फिनिक्स मिल, वरळी नाका, एनएबी स्कूलजवळील नेहरू तारांगण, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील मोहिते-पाटील नगर (पीएमजीपी कॉलनी), कुर्ला (प.) येथील एलबीएस मार्गावरील सेंट मायकल स्कूल ते स्टेट बँक ऑफ इंडिया, व्ही. एन. पुरव मार्ग येथील लाल डोंगर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील इंडियन ऑइल नगर, कांजूरमार्ग (प.) येथील सेंट झेवियर्स स्कूल ते बिर्ला कंपनी, घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड येथील साठेनगर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड येथील बांगूर नगर सिग्नल, दहिसर (प.) गावठाण येथील दहिसर नदी, वरळी सी-फेस येथील एनएबी ऑफिस या ठिकाणी सुमारे २५ कोटी ६३ लाख रुपये खर्च करून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हे पूल बांधण्यात येणार होते. त्यासाठी रेल्वेला पालिकेने १६.१ कोटी रुपयेही दिले. मात्र गेल्या वर्षभरात यापैकी एकाही पुलाचे काम पालिकेला सुरू करता आले नाही. अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला.
मोनो आणि मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे हे पादचारी पूल रखडले. एमएमआरडीएने आपल्या प्रकल्पांचे आराखडे सादर न केल्यामुळे पुलांच्या उभारणीचे नियोजन करता आले नाही. तसेच पादचारी पुलांच्या कामासाठी वाहतुकीच्या नियमनासाठी वाहतूक विभागाकडूनही सहकार्य करण्यात येत नाही, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता पालिकेने १४ पैकी सहा पुलांच्या उभारणीला पूर्णविराम दिला आहे. आता केवळ आठच पादचारी पूल उभारण्यात येणार असून त्यापैकी दोन पुलांच्या ठिकाणी भूजल चाचणी करण्यात आली आहे. या दोन पुलांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. काही ठिकाणी एमएमआरडीएच्या नाकर्तेपणामुळे, तर काही ठिकाणी वाहतूक विभागाच्या असहकारामुळे सहा पुलांचे काम अद्यापही रखडले आहेत. त्यामुळे या १४ ठिकाणी पादचाऱ्यांच्या छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या घटना आजही घडत आहेत.

Story img Loader