पैशांची निकड असलेली माणसे एकत्र आली आणि वाम मार्ग निवडला तर भन्नाट योजना तयार होते. अगदी फिल्मी स्टाइलने गुन्हा घडू लागतो. कुलाबा पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या ठकसेनांच्या सहा जणांच्या टोळीच्या अशाच भन्नाट कार्यपद्धतीने पोलीसही चक्रावले. बनावट डिमांड ड्राफ्ट बनवून त्यांनी मुंबईसह अनेक राज्यांत फसवणूक केली होती. दोन नकली बाप आणि त्याच्या दोन नकली मुली या टोळीच्या मुख्य कलाकार होत्या.
नालासोपाऱ्याला राहणारे सुरेंद्र पंजाबी (६०) आणि जनक ढोलकिया (५८) हे दोन्ही योगायोगाने एकत्र भेटले. दोन वर्षांपूर्वी लोकल ट्रेन बंद झाल्या होत्या. त्यावेळी अनेक प्रवासी घर गाठण्यासाठी रुळावरून पायी जात होते. पंजाबी आणि ढोलकिया यांची अशीच रुळावरून पायी चालत असताना ओळख झाली. दोघांना पैशांची गरज होती. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला ढोलकिया तसा कायद्यापलीकडे जाऊन विचार करणारा होता. पैसा कमवायचा तर वाकडय़ात शिरावं लागणार हे पंजाबीला सांगितलं. पण त्यासाठी एक टीम तयार करावी लागणार होती, शिवाय चकमा देणारी भन्नाट आयडियासुद्धा. मग ढोलकियाने शक्कल लढवली. नकली नोटा ओळखू येतात. मग नकली डिमांड ड्राफ्ट बनवला तर कुणाला कळणार नाही. नकली डिमांड ड्राफ्ट आजवर कुणी बनवून फसवूक केली नव्हती. मग असा हुबेहूब डिमांड ड्राफ्ट बनविणारा तंत्रज्ञ हवा होता.
ढोलकिया आणि पंजाबी कामाला लागले. राजेश कारानी याच्याशी ओळख काढली. त्याला संगणक आणि प्रिंटिंगचे उत्तम ज्ञान होते. त्याला विश्वासात घेतले. चांगले पैसे मिळतील. कधीच पकडले जाणार नाही, असे सांगितले. करानीने उत्तम डिमांड ड्राफ्ट बनवले. आता पुढील कामासाठी दोन मुली हव्या होत्या. तसेच एक मध्यमवयीन गृहस्थसुद्धा. पंजाबी नालासोपाऱ्यात जेथे राहायचा तेथे मिनी पांडे आणि टिना पांडे या विशीतल्या दोन बहिणी राहात होत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्या एका प्लॅस्टिक कारखान्यात काम करत होत्या. पंजाबीने त्यांना ही योजना सांगितली. फक्त थोडा अभिनय करायचा. बाकी आम्ही करू असे सांगितले. अशोक मेहता या साठीच्या घरातील मध्यमवयीन इसमालाही या टोळीत सामील करून घेतले.
फसवणुकीची अनोखी पद्धत..
सुरेंद्र पंजाबी आणि अशोक मेहता हे साठीतील इसम. त्यांनी वडिलांची भूमिका साकारली तर पिंकी आणि मिनीने त्यांच्या मुलींची. एखाद्या महागडय़ा शोरूममध्ये ते वडील आणि मुली बनून जायचे. पंचतारांकित हॉटेलातील महगडय़ा शोरूम्सला त्यांनी टार्गेट केलं होतं. कधी मेहता या मुलींना घेऊन जायचा तर कधी पंजाबी. त्यांना प्रत्येक कामासाठी तीन हजार रुपये देण्यात यायचे. या माझ्या मुली आहेत. त्यांचं लग्न ठरलंय, वाढदिवस आहे अशी कारणं सांगून सोन्याचे दागिने पंसद करायचे. महागडे सोन्याचे हार पसंद करायचे. लगेच चेक काढून द्यायचे. अर्थात चेक कुणी घेत नसायचे. मग डिमांड ड्राफ्ट आणून देतो असे सांगायचे. काही वेळाने डिमांड ड्राफ्ट आणून दिला जायचा. त्या शोरूमवाल्यांना अजिबात संशय येत नव्हता. शक्यतो शनिवारीच हे त्रिकुट खरेदीला जायचे. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सोमवारी बँकेत डिमांड ड्राफ्ट टाकला जायचा. बँकही तो स्वीकारायची. मात्र डिपॉझिट झाला की तो बनावट असल्याचे समजायचे.
आजवर ही गँग कधी पकडली गेलेली नव्हती. कुलाबा येथील ताज हॉटेलातील दिया प्रेशियस ज्वेलरी या शो रुममध्ये मे २०१४ मध्ये पंजाबी दोन्ही मुलींना घेऊन गेला होता. सात लाखांचा नेकलेस त्यांनी घेतला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन फसवणूक केली होती. कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर सुपले, पोलीस निरीक्षक सुभाष दुधगांवकर आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण यांच्या पथकाने या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढायला सुरुवात केली. पंजाबी, मेहता आणि या मुलींना अटक झाली. पाठोपाठ मुख्य सूत्रधार ढोलकिया आणि राजेश कारानी यांना अटक झाली. याबाबत माहिती देताना परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, या टोळीने मुंबईत वांद्रे, कुलाबा, भांडुप, खार या ठिकाणी अशा पद्धतीने फसवणूक केली होती. शिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजराथ या राज्यांतही त्यांनी ही पद्धत वापरून काम सुरू केले होते. पंचतारांकित हॉटेलातील शोरूममध्ये त्यांचा सहज वावर असायचा. ते हिंदी आणि इंग्रजीत बोलायचे. चांगले मॉडर्न कपडे घालायचे. त्यामुळे कुणाला संशय येत नव्हता. बनावट नोटा ओळखू येतात, पण डिमांड ड्राफ्ट बनवाट असेल याची कुणी कल्पनाही केलेली नव्हती. हाच धागा ओळखून त्यांनी गुन्ह्य़ासाठी ही पद्धत वापरली होती.
सुहास बिऱ्हाडे, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा