१,६०० वा प्रयोग १५ ऑगस्ट रोजी
‘खर सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ किंवा ‘ती परी अस्मानीची’ ही सुरेल गाणी, प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची जुळलेली ‘केमिस्ट्री’ आणि काही प्रयोगांनंतर खंड पडून पुन्हा रंगभूमीवर आल्यानंतरही प्रेक्षकांचा आजही प्रतिसाद मिळणारे नाटक म्हणजे ‘एका लग्नाची गोष्ट’. या नाटकाचा १,६०० वा प्रयोग १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सादर होणार आहे. नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट १९९९ रोजी सादर झाला होता.
सध्या विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असली तरीही अनेक घरांमध्ये आजही ‘तो, ती आणि तिचे सासू, सासरे’ राहातात. अपवाद वगळता अनेक घरांमध्ये सासू-सुनेचे भांडय़ाला भांडे लागत असतेच. ‘एका लग्नाची गोष्ट’मध्येही सासू-सून यांच्या भांडणात नवऱ्याची होणारी कुचंबणा दाखविली आहे. पहिल्यांदा हे नाटक ‘सुयोग’ने रंगभूमीवर आणले होते. आता सध्या ‘चंद्रलेखा’ हे नाटक सादर करत आहे. हे नाटक महाराष्ट्रासह अमेरिका, कॅनडा, दुबई, कतार, मस्कत येथेही गाजले.   नाटकाच्या ८०० प्रयोगानंतर कविता लाड-मेढेकर यांनी नाटकातून ‘एक्झिट’ घेतली. त्यानंतर नाटकात सुजाता जोशी यांचे आगमन झाले. प्रशांत दामले कायम होते. याचेही काही प्रयोग झाले. २००६ पर्यंत सुरू असलेल्या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला. काही काळानंतर कविता लाड-मेढेकर यांचे नाटकात पुनरागमन झाले आणि या दोघांच्या ‘लग्नाची गोष्ट’ पुन्हा प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरू झाली. श्रीरंग गोडबोले लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकात सध्या प्रशांत दामले, कविता लाड-मेढेकर यांच्यासह मंदा देसाई, जयंत घाटे, नीता पेंडसे, मुकेश जाधव हे सहकलाकार आहेत. पूर्वीच्या प्रयोगात या मुख्य जोडीसह श्याम पोंक्षे, शेखर फडके आदी कलाकार होते.
प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरू असलेल्या या नाटकाचा १,५९८ वा प्रयोग शनिवार, १० ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिरात तर १,५९९ वा प्रयोग रविवारी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे.  

Story img Loader