मुलीचे लग्न हा आजही आपल्या समाजात चिंतेचाच विषय आहे. एखाद्या मुलीचे ठरलेले लग्न मोडते तेव्हा त्या मुलीच्या मनावर नेमके काय ओरखडे उमटतात? तिच्यावर पर्यायाने तिच्या कुटुंबावर याचे काय परिणाम होतात, या गोष्टींचा आजवर कोणीही मागोवा घेतला नव्हता. नाटककार आणि लेखक संजय पवार यांनी आपल्या ‘ठष्ट’ या नाटकातून या विषयाला तोंड फोडले आहे. ‘ठष्ट’च का? इथपासून ते हे नाटक लिहिण्यामागे या विषयावर त्यांना सापडलेला नेमका निष्कर्ष कोणता होता, अशा विविध मुद्यांवर लेखक संजय पवार, निर्माता राहुल भंडारे आणि नाटकातील कलाकार यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘ठष्ट’च्या या गप्पा वाचकांसाठी..
*   संजय पवार  
माझ्या डोक्यातील ‘ठष्ट’
‘ठष्ट’ची जाहिरात सुरू झाल्यापासून अनेकांनी नावाच्या अर्थाबद्दल माझ्याकडे विचारणा केली. ‘ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट’ या वाक्यातील पहिलं आणि शेवटचं अक्षर घेऊन हे नाव बनवलं. हा विषय पाच-सहा वर्षांपासून माझ्या डोक्यात होता. माझ्या मैत्रिणींची अशी ठरलेली लग्ने मोडली होती आणि त्या एका वेगळ्याच ट्रॉमातून जात होत्या. सध्याच्या काळात घटस्फोटांवर अनेक कादंबऱ्या, चित्रपट आले आहेत. पण ठरलेलं लग्न मोडलं की, उद्भवणाऱ्या समस्येवर भाष्य करणारं काहीच नाही. याच दरम्यान माझ्या लक्षात आलं की, लग्न मोडतं तेव्हा दोघांचं मोडलेलं असतं, पण चर्चा मुलीच्या मोडलेल्या लग्नाची जास्त होते. एखाद्या मुलाने चार मुली नाकारल्या तरी चालतात, पण एखाद्या मुलीला चार मुलांनी नाकारणं यात खूप फरक पडतो. या सगळ्याबद्दल एकूण मुलींना काय वाटतं, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं, हे सगळं डोक्यात ठेवून मी हे नाटक लिहिलं होतं.
* मीच लेखक, मीच दिग्दर्शक!!
हौशी रंगभूमीवर काम करत होतो, तेव्हापासून माझी नाटकं मीच दिग्दर्शित करायचो. ‘गायीचा शाप’ आणि ‘साती साती पन्नास’ ही दोन नाटकं मी राज्य नाटय़ स्पर्धेत दिग्दर्शित केली होती. मात्र व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. पण हे नाटक लिहिल्यानंतरही मी मनाशी ठरवलं होतं की, हे नाटक आपणच दिग्दर्शित करायचं. सुदैवाने निर्मात्यांनी माझ्या या हट्टाला होकार दिला. नाहीतर मी हे नाटक समांतर रंगभूमीवरच केलं असतं. माझ्या नाटकाचा आत्मा दिग्दर्शक मारणार नाही ना, अशी एक धास्ती मला वाटत असते. त्यात स्त्री-वादी नाटकं कटाक्षाने मीच दिग्दर्शित करत असतो.
* सध्याचा समाज घुसळणावस्थेत
गेल्या काही वर्षांत आपल्याकडे अनेक गोष्टींची खूप सरमिसळ झाली आहे. त्यामुळे एकच एक असं काही बाजूला काढता येत नाही. नवीन पिढीचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. जातीयतेवर वगैरेही आताची पिढी खूप ग्लोबलाइझ्ड झाली आहे. पण तरीही काही वेगळे मुद्दे आहेत. त्यांना आपण जुन्या पद्धतीने नाही समजावून सांगू शकत. जुनी पद्धत त्यांना भिडेलच असं नाही. त्यांचे विचारच बदलले आहेत. दहावी पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी डोनेशन मागितलं, तर ही पिढी म्हणते, शिकायचं असेल तर मग डोनेशन भरावंच लागणार. हा बदल आपल्याला न झेपणारा आहे. साठ-सत्तरच्या दशकात दलितांचे प्रश्न होते. ऐंशीच्या दशकात महिलांचे प्रश्न आले. नव्वदच्या दशकात भटक्या-विमुक्तांचे अनेक प्रश्न चळवळीतून समोर आले. मात्र आता यापुढच्या काळात स्त्री आणि पुरुष यांच्यातील संघर्षच असेल. या सगळ्यात बाकीचे मुद्दे मागे पडणार आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धावर १९व्या शतकाचा प्रभाव होता, पण २१व्या शतकात २०व्या शतकाचा प्रभाव पूर्णपणे पुसला गेला आहे.
*  राहुल भंडारे
प्रेक्षक खूप चोखंदळ आहेत
मी माझी इतर नाटकं घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, त्या वेळी जाणवलं की, प्रेक्षक खूप चोखंदळ आहेत. विषय चांगला असला तरी नट कोण आहे, याकडेही ते लक्ष ठेवून असतात. म्हणजे अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे आहेत का, याची चौकशी होते. हे नाटक पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक वगैरे शहरात चालणारं आहे, पण निर्माता म्हणून मी हे नाटक घेऊन सध्या तरी ग्रामीण भागांत जाऊ शकत नाही. ग्रामीण भागांत या सामाजिक प्रश्नाबद्दल कितपत जागरूकता आहे, हा दुसरा मुद्दा. पण तिथे नाटय़गृहच नाहीत. ज्या ठिकाणी नाटय़गृहं आहेत, तिथे प्रेक्षक येत नाही. वास्तविक आम्ही चांगली नाटकं घेऊन त्यांच्यापर्यंत जात नाही, हा आमचा दोष आहे.
* बिस्किट तुमचं, वेष्टन माझं
कोणताही आव आणता येतो, पण पैशाचा आव आणता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला मी काही गिमिक्स वगैरे असलेली नाटकं केली. त्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळाला. या धंद्यात प्रस्थापित असलेल्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी ते आवश्यक होतं. पण आता स्थैर्य आल्यानंतर मग नवनवीन विषय हाताळायला घेतले आहेत. ‘शिवाजी अंडरग्राउंड’सारखं नाटक करण्याचं धाडस मला या आर्थिक स्थैर्यामुळेच करता आलं. मी संजय पवार यांचा खूप मोठा चाहता आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला त्यांच्या एकांकिका खूप आवडायच्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यावर मी त्या संधीवर अक्षरश: झडप घातली. आताचं नाटकही थोडंसं धाडसाचंच आहे. हे नाटक व्यावसायिक नाही, असं म्हणून त्याला डावलण्याची शक्यता आहे. म्हणूनच मी संजय सरांना सांगितलं की, तुम्ही फक्त दिग्दर्शन करा. बिस्किट तुमचं असेल, पण ते बिस्किट कोणत्या वेष्टनात विकायचं, ते मी ठरवेन.
*  रेश्मा रामचंद्र
भूमिकेमध्ये गुंतून राहणं किंवा त्यातून पटकन बाहेर येणं, हा सवयीचा भाग असतो. आपण नवीन असलो तर सुरुवातीला आपण थोडे त्यात गुंतून राहतो, पण अनुभव वाढत जातो त्या वेळी सवयीने ‘स्विच ऑफ-स्विच ऑन’ करता येतं. त्याचबरोबर लेखकाने लिहिलेला विचार पटलाच पाहिजे, अशी काही जबरदस्ती नसते. पण रंगमंचावर जाताना, त्या भूमिकेला तो विचार पटला असेल, तर तो विचार माझाच आहे, या आत्मविश्वासाने मांडता येणं गरजेचं असतं. या नाटकातल्या अनेक गोष्टींशी आम्ही समरस होतो. या गोष्टी आपल्या किंवा आपल्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यातील आहेत, असं वाटतं. या संपूर्ण प्रक्रियेत एक लक्षात आलं की, अनेक मुद्दे आपल्या मनात होते, पण ते बोलून दाखवले नव्हते.  नाटकाच्या माध्यमातून  बोलून दाखवले आहेत. साधी गोष्ट, मी आता नाटक वगैरे क्षेत्रात काम करते. त्यामुळे  मी अमुक वेळी घरी परतावं, वगैरे अपेक्षा मी सून असल्याने माझ्याकडून केल्या जातात. तो मोकळेपणा मलाही नाहीए. म्हणजेच स्त्री-पुरुष समानता आणण्यात आपण कुठेतरी सामाजिकदृष्टय़ा कमी पडत आहोत. माझ्या घरातच मी ते अनुभवत आहे.
*  सुपर्णा श्याम
या गोष्टी मुलींच्या आयुष्यात घडतात, हे फक्त पेपरमध्ये वाचून माहिती होतं. तेवढय़ापुरतं वाईटही वाटायचं, पण त्याविरोधात मला काही पाऊल उचलता येत नव्हतं. मला एक नट म्हणून किंवा व्यक्ती म्हणूनही खूप आनंद वाटतोय की, या नाटकाच्या माध्यमातून माझे विचार मांडणार आहे. समाज हे विचार नक्कीच स्वीकारेल, याचीही खात्री वाटतेय. कदाचित याला विरोध होण्याची शक्यता आहे, पण तो होऊ नये ही इच्छा आहे. मी अपेक्षा करतेय की, हे नाटक म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एक आरसा बनेल.
*  पूजा गायकवाड
मी स्वत: हॉस्टेलमध्ये राहिले आहे. त्यामुळे सरांची स्क्रीप्ट वाचताना आपण हे अनुभवलं आहे, असं वाटलं. आता अभिनय करताना ही गोष्ट जाणवत राहते. नाटकात मी ज्या गोष्टी करते, त्या गोष्टी खऱ्या आयुष्यात करायची गरज आहे. माझ्याकडे शिक्षण, नोकरी असतानाही मी दबून राहण्याची गरज नाही, हे पटतं. आपण रिअ‍ॅक्ट होत नाही आणि हेच सरांनी खूप स्पष्टपणे लिहिलं आहे. हे नाटक असलं तरी ते सगळंच खरं आहे. मी जी भूमिका करते ती एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती माझी नसली तरी नाटकात ती भूमिका करताना ती माझी म्हणूनच सादर करणं, हे माझं काम आहे.