मुक्ता अवचट मुक्तांगण संस्थेच्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या तर आशीष पुणतांबेकर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीमध्ये कार्यरत. मुक्ताला प्रसिद्धीचे वलय तर आशीषचे कुटुंब प्रसिद्धीपासून दूर. दोघांच्याही घरातील वातावरण भिन्न. तरीही मुक्ता-आशीष यांची आधी ओळख, मग मैत्री पुढे प्रेम आणि मग लग्न अशा प्रवासाची गोष्ट वेधच्या व्यासपीठावर उलगडली आणि त्यांनी साधलेला जीवनाचा ताल आणि तोल रसिकांनी त्यांच्या संवादातून अनुभवला.
वेधच्या व्यासपीठावर प्रसिद्धीच्या वलयात असलेली पत्नी आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला पती यांच्या जीवनातील ताल, तोल जाणण्यासाठी या खास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुक्ता आणि आशीष पुणतांबेकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारत आपल्या आयुष्याचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. पुण्यातील अवचट आणि पुणतांबेकर कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक मैत्री होती. मात्र याच ओळखीच्या धाग्यातून मुक्ता आणि आशीषच्या भेटी सुरूझाल्या.
मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुक्ताला आशीषच्या रूपाने प्रयोगासाठी हक्काचा विषय मिळाल्याने त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली होती तर मुक्ताच्या व्यक्तिमत्त्वामधील मोकळेपणा आणि महिला म्हणून आपण कोणत्याही गोष्टीत कमी नाही, असा आत्मविश्वास. त्यामुळे या मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागला नाही. एकमेकांचा स्वभावधर्म ओळखलेल्या या दोघांनी लग्न करायचे ठरवले आणि घरच्यांनीही त्यांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. लग्न करताना मात्र लग्नासाठी लागणारा सगळा खर्च घरच्यांकडून घेण्याचे या दोघांनी टाळले होते. त्यामुळे नोंदणीपद्धतीने लग्न आणि त्यानंतर प्रत्येक जबाबदारीही त्यांनी कुटुंबावर पडणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली.
लग्नापूर्वी असलेले प्रेम लग्नानंतर मात्र बदलत जाते आणि एकमेकांमधील आदरही कमी होत जातो हा सार्वत्रिक अनुभव असला तरी पती-पत्नीपेक्षा आपण मित्रच अधिक राहिल्यामुळे प्रेम कायम राहिले. लग्नानंतर भांडणे होत असतात. मात्र भांडणाचे नियम केले तर ते त्रासदायक होत नाहीत असे सांगत मुक्तांगणमधल्या भांडणाचे पाच नियम मुक्ता यांनी उपस्थितांसमोर मांडले.
भांडण सुरू असताना भांडणाचा विषय बदलू नये, भांडण पंधरा मिनिटांमध्ये संपवावे, मुलांसमोर भांडायचे नाही, एक उगाच भांडत असेल तर दुसऱ्याने शांत राहावे आणि एकाने दुसऱ्याला चुकांची विशेषणे लावू नये, असे नियम असल्याने आपले भांडणही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आजही आपले घर मुक्तांगणच्या संचालिकेचे घर आहे असेच घराची मांडणी असल्याचे दोघांनी या वेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा