संतूर आणि कथक यांच्या मिलाफातून साकारलेली ‘गोष्ट गंगावतरणाची’.. चंद्रकांत काळे आणि अश्विनी गिरी यांनी केलेले अभिवाचन.. रंगमंचावर सादर झालेले ‘सौदागर’ हे सामाजिक-राजकीय नाटक.. माध्यमे वेगवेगळी असली तरी त्या सर्वातून ‘कथा’ उलगडली आणि बाळगोपाळांच्या अमाप उत्साहात तीन दिवसांच्या कथा महोत्सवास शुक्रवारी सुरुवात झाली.
भाषा फाउंडेशनतर्फे आयोजित कथा महोत्सवाचे उद्घाटन नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. कॅलिफोर्निया येथील ‘बुक्स ऑन बोर्ड’चे एलिस वॉन्स आणि ज्येष्ठ रंगकर्मी बन्सी कौल याप्रसंगी उपस्थित होते. फाउंडेशनच्या स्वाती राजे यांनी लिहिलेल्या ‘प्रवास’, ‘रस्ता’ आणि ‘पाऊस’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, देवाने बुद्धी दिली तरी रस हा निर्माण करावा लागतो. गोष्ट ही रस निर्माण करून बुद्धीला चालना देते. अशा गोष्टी ऐकण्यामध्ये मला रस आहे. गोष्ट ही दररोज लागणारी गोष्ट आहे. मात्र, कथेचा दिवस साजरा करावा लागतो ही वाईट गोष्ट आहे.  
मदन ओक यांचे संतूरवादन आणि शांभवी स्कूल ऑफ कथक संस्थेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले नृत्य या मिलाफातून गंगावतरणाची गोष्ट उलगडली. चंद्रकांत काळे यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘शाळा तपासणी’ या कथेचे तर, गुलजार यांच्या ‘रावीपार’ कथासंग्रहातील ‘हात पिले कर दो’ या कथेचे अश्विनी गिरी यांनी अभिवाचन केले. उत्तरार्धात बन्सी कौल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सौदागर’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.     
गिरीश कर्नाड यांच्या कथनातून उलगडले कथेचे विविध पोत
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत गिरीश कर्नाड यांनी कथनातून साधलेल्या संवादाद्वारे कथेचे विविध पोत उलगडले. माझ्या बालपणी घरातील ज्येष्ठ महिला मग, ती आजी असेल किंवा काकू हीच मुलांना गोष्ट सांगून त्यांचे मनोरंजन करायची. या गोष्टीतून मुलांना वर्तनाचे धडे मिळायचे. त्याबरोबरच घराचे आणि समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहत असे. लोककथा असो किंवा अभिजात कथा या साऱ्या कथांचा साचा साधारणपणे सारखाच असल्याचे दिसते. सत्यवान-सावित्री, नल-दमयंती यांसारख्या कथा विवाहानंतरच्या वियोगाच्या आहेत. शिकारीला गेलेल्या राजपुत्राची राजकन्येशी भेट झाली अशी पुरुषांच्या कथेची सुरुवात होते. त्यांचा विवाह झाला आणि ते सुखाने नांदू लागले असा या कथेचा शेवट असतो. तर, ‘माझं लगीन झालं’ यापासूनच मुलींच्या कथेची सुरुवात होते.

Story img Loader