कल्याण-डोंबिवली शहरातील विविध भागांत १६ हजाराहून अधिक भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेत गटागटाने ही कुत्री नागरिकांच्या अंगावर चावण्याच्या हेतूने धावतात. त्यातील सुमारे साडेपाच हजार कुत्र्यांची गेल्या वर्षभरात नसबंदी करण्यात आली आहे. या नसबंदीसाठी पालिकेने ५६ लाख ५७ हजार रुपये खर्च केले आहेत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात १४४ अनधिकृत मटण-मासळी विक्रीची दुकाने आहेत. पालिकेच्या आधारवाडी कचराक्षेपणभूमीवर शहरातील कचरा दररोज टाकण्यात येतो. मेलेली जनावरे येथेच टाकण्यात येतात. या सगळ्या व्यवस्थेवर ही भटकी कुत्री दिवसभर ताव मारतात. रात्रीच्या वेळेत ही सर्व कुत्री त्या त्या भागात वस्तीसाठी येतात. रात्रीच्या वेळेत अनेक वेळा प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीत. या पादचारी प्रवाशांना गाठून ही भटकी कुत्री त्याच्यावर हल्ला करतात. कुत्र्यांना ठार मारू नये, असे न्यायालयाचे आदेश असल्याने पालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांची तक्रार आल्याशिवाय कुत्र्यांना पकडत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
गेले आठ ते नऊ महिन्यांत शहराच्या विविध भागात २५ ते ३० नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावे घेऊन जायबंदी केले आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर नावाची संस्था दर महिन्याला २५० ते ३०० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करते. एका कुत्र्यासाठी ८८० रुपये खर्च येतो. पालिकेने या कामासाठी अर्थसंकल्पात ६० लाखाची तरतूद केली आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. नसबंदी केलेल्या कुत्र्यांना ‘व्ही’ आकाराची खूण करून त्यांना सोडून देण्यात येते.
नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता पालिकेच्या पथकाने कार्यालयीन कामाच्या दिवशी शहराच्या भागातील कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया व चावकी कुत्री डांबून ठेवण्यासाठी कार्यरत राहावे अशी नागरिकाची मागणी आहे.

Story img Loader