उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक धास्तावले आहेत. गेल्या अकरा महिन्यांत श्वानदंश झालेल्या १३४४ नागरिकांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद आहे. यानुसार दर महिन्याला सरासरी १२२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे निष्पन्न होत आहे. यातच श्वानदंशाने होणारा रॅबीज टाळण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिबंधात्मक लस मागील वर्षेभरापासून जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध नाहीत. कुत्र्यांची निर्बिजीकरणही मोहीम थंडावल्याने श्वानांच्या संख्येत भर पडत आहे.
रात्रीच्या वेळी उरण शहरातील मोरा, कोटनाका, आनंदनगर, कामठा, पेन्शनर्स पार्क, बोरी आदी भागांतून प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांच्या मागे कुत्र्यांचा घोळका भुंकत आल्याने भीतीमुळे अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच जेएनपीटी कामगार वसाहतीत एका कर्मचाऱ्याच्या मोटारसायकल समोर आलेल्या कुत्र्यामुळे कामगार जखमी होऊन त्याच्या हातापायांना फ्रॅक्चर झाले आहे. अशाच घटनांना रात्रपाळीच्या वेळी कामावरून परतणाऱ्या शहरी तसेच ग्रामीण भागातील कामगारांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात धक्कादायक बाब म्हणजे उरण तालुक्यात उरण शहर, चिरनेर, जासई तसेच विंधणे या परिसरात विभागीय पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यात श्वानदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले औषधे मागील वर्षभरापासून मागणी करूनही उपलब्ध झालेली नसल्याची माहिती उरण पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. जाधव यांनी दिली आहे.

Story img Loader