ठाणे महापालिकेवर गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. या सत्तेचे सूत्र सध्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे. एकनाथ‘भाई’ म्हणतील ती पूर्वदिशा असा महापालिकेतील एकंदर कारभार आहे. ठाण्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की एकनाथभाईंची पावले अलगद रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळतात. मग मुजोर रिक्षाचालक असोत अथवा फेरीवाले, भाईंचे समर्थक त्यांना बदडून काढतात. प्रवाशांचा मार्ग खुला करून देतात. मात्र, निवडणुका झाल्या की स्थानक परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे साम्राज्य सुरू होते. एकनाथभाईंपेक्षा मग फेरीवालेच प्रवाशांवर ‘भाईगिरी’ करू लागतात, असा अनुभव आहे. राजीव यांनी फेरीवाल्यांची ही दादागिरी थांबवली होती. गुप्ता यांनी मात्र स्थानकाकडे पाठ फिरवल्याने प्रवाशांचे हाल पुन्हा सुरू झाले आहेत.

ठाणे शहरातील बिल्डरांसाठी वाढीव चटईक्षेत्राचे गाजर पुढे करून रियल इस्टेट क्षेत्रात ‘फील गुड’ची हवा निर्माण करणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता आणि त्यांच्या प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांविषयी फारसे देणेघेणे उरले नसल्याचे चित्र सध्या ठाणे स्थानकाच्या अवतीभोवती नजरेस पडू लागले आहे. लाखो प्रवाशांचे येण्याजाण्याचे ठिकाण असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने कोटय़वधी रुपयांचा खर्च करत सॅटीस प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प उभारल्याबद्दल या भागातील आमदार आणि काही नगरसेवक अजूनही स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात धन्यता मानतात. असे असताना गेल्या महिनाभरापासून ‘सॅटीस’वर जागोजागी फेरीवाल्यांचा विळखा पडला असून त्याविषयी प्रशासनासह एकही लोकप्रतिनिधी साधा ‘ब्र’देखील उच्चारण्यास तयार नाही. बघावे तिथे फेरीवाले अशी स्थिती या भागात निर्माण झाल्याने प्रवाशांना बसथांब्यावर पोहोचेपर्यंत बरीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र असून बिल्डरांवर ‘असीम’ माया दाखविणारे महापालिकेचे प्रशासन या फेरीवाल्यांवर वक्रदृष्टी कधी दाखविणार, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकर उपस्थित करू लागले आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असा ठाण्याचा बोलबाला राहिला आहे. रेल्वेच्या एका अहवालानुसार या स्थानकातून दररोज सुमारे सहा लाख प्रवासी ये-जा करत असतात. पूर्व-पश्चिम तसेच घोडबंदर मार्गावरील रहिवाशांसाठी हे एकमेव स्थानक आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने विस्तारित स्थानकाची चाचपणी सुरू केली आहे. ठाणेकर नागरिकांसाठी रेल्वे स्थानक परिसराचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या भागात वेगवेगळे विकास प्रकल्प आखण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या परिसरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून ‘सॅटीस’सारखा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, हाच प्रकल्प आता ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागला असून बेकायदा फेरीवाल्यांसाठी हक्काचे छत ठरू लागला आहे. सॅटीस पुलावर ठाणे परिवहन सेवेचे बस थांबे तर पुलाखाली रिक्षा स्थानक उभारण्यात आले आहे. तसेच प्रवाशांकरिता पदपथही तयार करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सॅटीस पुलावर तसेच पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून पदपथांवरही या फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी काही कठोर उपाययोजना हाती घेतल्या.
सॅटीसवर एकही फेरीवाला बसू नये, असे आदेश त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला दिले. राजीव यांच्या दट्टय़ामुळे तब्बल दोन वर्षे सॅटीस फेरीवालामुक्त होता. मात्र, विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांच्या बोटचेप्या धोरणामुळे सॅटीसवर पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे बस्तान बसले असून प्रभाग अधिकारी तसेच अतिक्रमण विरोधी पथकातील काही ठरावीक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानक परिसरातील पुलाखाली रिक्षांची कोंडी नित्याची होऊ लागली असून त्यामध्ये अनेकांना अडकून पडावे लागत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने प्रवाशांना रस्त्याचा आधार घ्यावा लागतो आहे. तसेच रिक्षांच्या कोंडीतून त्यांना मार्ग शोधावा लागत असल्याचे चित्र आहे. असे असतानाही ठाणे महापालिकेचे अतिक्रमण पथक मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Story img Loader