ठाणे स्थानक परिसर, रेल्वेचे पादचारी पूल, सॅटिस, स्काय वॉक, शहराच्या विविध भागातील रस्ते आणि त्याच्या बाजूचे पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात असून जागोजागी आपल्या पथारी पसरून या फेरीवाल्यांनी परिसरावर पुरते अतिक्रमण केले आहे. याचा सर्वाधिक फटका शहरातील सामान्य पादचाऱ्यांना होत आहे. फेरीवाल्यांचे जथ्थेच्या जथ्थे बिनधास्त मोक्याच्या जागांवरून आपला व्यवसाय वाढवत असताना महापालिका प्रशासन मात्र याकडे पुरते डोळेझाक करत आहे, तर फेरीवाला धोरण अंमलबजावणी प्रक्रिया सुरूझाल्यानंतर पूर्वी टोपल्या घेऊन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी हातगाडय़ा आणि टपऱ्या ठोकण्यास सुरुवात केली असून त्यामुळे शहराच्या दुरवस्थेत अधिक भरली आहेच, शिवाय फेरीवाल्यांच्या कोंडाळ्यातून वाट काढत सामान्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, स्टेशनातून जाणारा स्टेशन रस्ता, तलावपाळीकडे जाणारा रस्ता, राममारुती रस्ता, गोखले रोड हे ठाण्यातील अत्यंत वर्दळीचे रस्ते असून या रस्त्यांवर वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. रस्त्याच्या बाजूला लागून असलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांचा मोठा राबता असतो. याच रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाल्यांनी आपली बस्ताने बांधल्याचे चित्र सध्या दिसत आहे. फळे, भाजीपाला, कपडे, पुस्तके, इलेक्ट्रिकल वस्तू, चायनीज वस्तू, मोबाइलचे साहित्य, बॅग्स, चपला, कटलरी वस्तू अशा सर्व प्रकारची विक्री करणारे फेरीवाले या भागात बसत असून याचा मोठा अडथळा पादचारी सहन करत आहेत. विशेष म्हणजे पूर्वी छोटय़ा पथारी अंथरणाऱ्या, टोपल्यांमधून भाजी विकणाऱ्या फेरीवाल्यांची हिंमत वाढली असून महापालिकेच्या कारवाईची भीतीसुद्धा आता कमी झाल्याने फेरीवाल्यांनी चक्क हातगाडय़ा उभारण्यास सुरुवात केल्या आहेत, तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनीच टपऱ्या ठोकून आपला कायमस्वरूपी धंदा सुरू केला आहे. स्थानक परिसरातील सर्व रस्ते, विशेषत: जुन्या बाजारपेठ मार्गावर फेरीवाले प्रकर्षांने दिसून येतात. मासुंदा तलावालगतच्या रस्त्यास खाऊगल्लीचे रूप देऊन फेरीवाल्यांनी परिसराच्या विद्रूपीकरणास हातभार लावला आहे. राममारुती रोड आणि गोखले रोड हे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात असून या व्यापारी केंद्रांची अवस्थाही सारखीच असून या भागातील हमरस्त्यावर फेरीवाल्यांच्या गाडय़ा उभ्या राहू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Story img Loader