एकेकाळी तळ्यांचे गाव असा लौकिक असणारे ठाणे आता टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी अडविलेल्या रस्त्यांचे शहर बनले आहे. १५ वर्षांपूर्वी टी.चंद्रशेखर आयुक्त असताना महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून अतिक्रमणे हटविल्याने ठाण्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र त्यानंतरच्या काळात फेरीवाल्यांनी पुन्हा ठाणेकरांची वाट अडविण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात मोक्याच्या ठिकाणच्या सर्व जागा फेरीवाल्यांनी व्यापल्या आहेत. सांस्कृतिक ठाण्याचे नाक आणि वाचन संस्कृतीचा केंद्रबिंदू मानले जाणारे ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयही त्यास अपवाद नाही. वाचनमंदिराच्या दार अडवून बसलेली टपरी आणि फेरीवाले हटवावेत म्हणून संस्था गेल्या दोन दशकांहून अधिक काळ महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र न्यायालयाचे आदेश असूनही महापालिका प्रशासन टपरी हटविण्यास तयार नाही. विशेष म्हणजे प्रवेशद्वाराशेजारीच महापालिकेचे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ असा फलक आहे. मध्यंतरीच्या काळात ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीचे नूतनीकरण झाले. मात्र दोन दशकांपूर्वीपासून ठाण मांडून असलेली अतिक्रमणे काही हटली नाहीत. त्यातील एका प्रवेशद्वारासमोर कपडे विक्रेत्याची टपरी आहे तर दुसऱ्या समोर एक सरबताची गाडी, दोन चावी विक्रेते तर एक दाबेलीचा ठेला आहे. ग्रंथालयाची दारेच अशा पद्धतीने अडविल्याने वाचक, कर्मचारी तसेच या पाच मजली इमारतीतील इतर कार्यालयांमध्ये येणारे ग्राहक, नागरिकांची गैरसोय होते. ग्रंथालय व्यवस्थापन ही अतिक्रमण हटविण्याबाबत नियमितपणे महापालिका प्रशासनाला स्मरणपत्रे पाठविते, पण अद्याप त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रंथालयाच्या अर्थकारणावरही परिणाम  
इमारतीच्या नूतनीकरणानंतर त्यातील काही गाळे/सदनिका भाडेतत्त्वावर देऊन ग्रंथालयाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या संस्थेच्या मनसुब्यांवरही या अतिक्रमणांमुळे पाणी फेरले आहे. प्रवेशद्वारातच अतिक्रमणे असल्याने मोक्याच्या जागी असूनही त्या तुलनेत अतिशय कमी भाडे मिळते, अशी माहिती ग्रंथालयाच्या सूत्रांनी दिली.