पनवेल शहरात सध्या बहरलेले पनवेल म्हणून राजकीय जाहिरातींना ऊत आलेले आहे. मात्र या शहराचे वास्तव या पलीकडे आहे. पनवेल रेल्वेस्थानकापासून शहरापर्यंत असलेल्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने या अंधारलेल्या वाटेतून सर्वसामान्य पनवेलकरांना वाट काढावी लागत आहे. नगरपालिकेच्या वीज व्यवस्थेच्या कारभारामुळे ही वेळ आली असल्याने बहरलेले की अंधारलेले पनवेल असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
पनवेल शहरात एकूण १७०० पथदिवे आहेत. यापैकी रोजच्या वर्दळीच्या मार्गावर पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेत पायी चालणाऱ्यांना सामान्यांना खड्डा आणि चिखलात पाय गेल्याशिवाय चालता येत नाही. यातच समोरून येणारे वाहन अंगावर येण्यापासून रोखण्याचा खेळ खेळत मार्गक्रमण करावे लागत आहे. मात्र नागरिकांनाही अनेक वर्षांपासून बंद असलेल्या पथदिव्यांमुळे ही कसरत नित्याची झाली आहे. त्यामुळे पनवेलमधील दिवे कधी सुरू होते, असा इतिहास सांगणारे ज्येष्ठ नागरिक येथे बहुसंख्य आहेत. रेल्वे स्थानक ते घर हे अंतर अनेक जण आजही पायी प्रवास करून गाठतात. यामध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. या महिलांना रात्रीच्या या अंधारमय रस्त्यावरून भरभर मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागते. पनवेल एसटी डेपोसमोर पुलाखाली असणाऱ्या अंधारामुळे राजकीय व्यासपीठावरून बहरलेल्या पनवेल संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूठमाती मिळत आहे. पनवेलच्या या पुलावरील अंधार हा एमएमआरडीए आणि नगर परिषदेच्या समन्वयाअभावी पडलेला आहे. तो दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधीही झटताना दिसत नाही. याबाबत पनवेल नगर परिषदेच्या वीज वितरणव्यवस्था राबविणाऱ्या विभागाशी संपर्क साधल्यावर येथील अधिकाऱ्यांनी सतराशे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दोन कर्मचारी असल्याचे सांगून लवकरच शहरातील बंद पथदिवे दुरुस्त करणार असल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा