पुण्यातील बऱ्याच गणपती मंडळांनी या वर्षी पौराणिक देखाव्यांपेक्षा सामाजिक देखाव्यांवर भर दिला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, चिल्लर पार्टी, रेव्ह पार्टी, पाणीसमस्या, गुटखा विरोध, वृद्धाश्रम, शेतकरी आत्महत्या, कचरा समस्या, अन्नाची नासाडी असे विविध सामाजिक विषय गणेशोत्सव मंडळे यंदा हाताळणार आहेत. यात मोठय़ा मंडळांबरोबरच छोटय़ा मंडळांचाही समावेश आहे. सामाजिक विषयात स्त्रीभ्रूणहत्येवरील देखाव्यांची संख्या सर्वाधिक आहे.
पुण्यातील गणपतीत अगदी पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत कंसवध, लंकादहन, कालियामर्दन, ज्ञानेश्वरांनी रेडय़ाकडून वदवून घेतलेले वेद, शंकराचे तांडवनृत्य, नरसिंह, कृष्णलीला, रावणाचे गर्वहरण अशा पारंपरिक देखाव्यांचीच चलती असे. दर वर्षी याच देखाव्यांची पुनरावृत्ती होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र पालटत आहे. आता लोकजागृती करणारे देखावे सादर करण्याकडे बऱ्याच मंडळांचा कल दिसत आहे. काही मंडळे पौराणिक देखाव्यांच्या आधारे काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. उदाहरणार्थ- शिवाजीमहाराजांचा न्यायनिवाडा आणि आजच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, कंसाने देवकीची मुलगी समजून यशोदेच्या निष्पाप मुलीच्या केलेल्या हत्येचा संदर्भ देऊन सध्याची स्त्रीभ्रूणहत्येची समस्या. याबद्दल देखावे तयार करणारे कलाकार सतीश तारू म्हणाले की, आमच्याकडे येणाऱ्या बहुतांश मंडळांना विविध सामाजिक विषयांवर देखावे करून घ्यायचे आहेत. या गणेशोत्सवात आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’चे प्रतिबिंब पडणार आहे. तसेच, रामदेव बाबा, अण्णा हजारे यांचे देखावेही आम्ही तयार केले आहेत. गाजत असलेल्या ‘चिल्लर पार्टी’वर आधारित एक जनजागृतीपर देखावा करण्याचे कामही सध्या हाती घेतले आहे.
काही मंडळे जिवंत देखावे, पथनाटय़ यांच्या आधारे सामाजिक जागृती करणार आहेत. याविषयी ‘सेवा मित्रमंडळा’चे अध्यक्ष चेतन पवार यांनी सांगितले, की या वर्षी आम्ही लग्नसमारंभ, पाटर्य़ा या ठिकाणी होणारी अन्नाची नासाडी हा विषय नाटय़छटा, दृक्-श्राव्य माध्यमातून सादर करणार आहोत. आम्ही गेले वीस वर्षे असे सामाजिक विषयांवरील देखावे सादर करीत आहोत. आता आमचा असा वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे पौराणिक देखाव्यांप्रमाणेच असे वेगळे देखावेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक आमच्या या उपक्रमाचे कौतुक करतात. तसेच, प्रेक्षकांच्या सूचनांप्रमाणे आम्ही देखाव्यातील संवाद, गीते, घोषणा यात बदलही करतो.
‘आदर्श मित्र मंडळ’ चे उदय जगताप यांनी सांगितले की, आम्ही ‘आदर्श नव्या पिढीचा, वारसा जुन्या पिढीचा’ हा विषय मांडणार आहोत. या अंतर्गत क्रीडा, चित्रकला, गायन, वादन, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या आपल्यातीलच काही प्रतिभावंतांना प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. त्यांच्या कार्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दिली जाईल. यामुळे प्रेक्षकांनाही प्रोत्साहन मिळेल आणि या प्रतिभावंतांना एक व्यासपीठही उपलब्ध होईल.