स्थानिक संस्था कराविरोधात व्यापाऱ्यांचा बंद अद्यापही सुरू असतानाच त्यात पेट्रोल पंपही सहभागी झाल्याने पेट्रोल पंपावर सोमवारीही वाहन चालकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. आजपासून हॉटेल व्यावसायिकांनीही बंद पुकारला. वाढत्या तापमानाबरोबरच व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची झळही आता ग्राहकांना बसू लागली आहे. ग्राहकांना चटके बसत असले तरी सर्व शासकीय यंत्रणा राष्ट्रपतींच्या व्यवस्थेत गुंतल्याने ग्राहकांचा आता कुणीच वाली राहिला नसल्याची स्थिती उद्भवली आहे.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) महाराष्ट्र शासनाने १ एप्रिलपासून राज्यातील सर्व नगर पालिका व महापालिकांमध्ये सुरू केला. किमान दहा रुपये विक्रीची पावती तसेच ग्राहकाचा संपर्क क्रमांक, खरेदी-विक्रीची रोजची नोंद आदींसह अनेक तरतुदी जाचक वाटत असल्याने व्यापाऱ्यांनी या विरोधात आंदोलन पुकारले आहे. व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरूच असून आजच्या सातव्या दिवशीही तो सुरूच आहे. इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, धरमपेठ, सदर आदींसह शहराच्या इतरही भागात किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता अनेक दुकाने सोमवारी बंद होती. शनिवारी बडकस चौकात काही दुकानांवर दगडफेक झाल्याने इतर दुकानदारांनीही त्याचा धसका घेतला आहे. अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत.
पेट्रोल पंप मालकांच्या संघटनेही आंदोलनात उडी घेत शनिवारी व रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवले. त्यामुळे अनेक वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. आज पंप उघडले असले तरी दिवसभर तेथे वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. ३० एप्रिलपर्यंत खरेदी बंद केली असल्याचे पंप मालकांच्या संघटनेने तसेच बुधवारी भारतीय जनता पक्षाने शहर बंद पुकारल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. अनेकांनी जास्तीचे पेट्रोल भरून घेतले. त्यामुळे सायंकाळपर्यंत अनेक पंप पेट्रोल व डिझेलअभावी बंद झालेहोते. विविध कर भरत असतानाच ‘एलबीटी’च्या रुपाने आणखी कर लादण्यात आल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट चालकांनी बंद पुकारला.
इतवारीत नागपूर जनरल र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष राजू माखिजा यांच्या नेतृत्वाखाली किशोर भय्या, गोपाल अग्रवाल, अशोक आहुजा, सुशील सेठिया, नंदलाल हेमराजानी, आशिष अग्रवाल, पंकज पडिया, भगवानदास लचुरिया, चंदू खंडरानी, शंकरलाल अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल व इतर व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात व्यापारी तसेच भाजपच्या नागपूर व्यापारी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली. महापौर अनिल सोले, ‘एनव्हीसीसी’चे उपाध्यक्ष मयूर पंचमतीया, एलबीटी संघर्ष समितीचे संयोजक रमेश मंत्री आदी प्रामुख्याने उपस्थित होते. चुंगी कराच्या विरोधातही ‘एनव्हीसीसी’ने आंदोलन केले. तो हटवून नवा एलबीटी अन्यायकारक आहे. तो कुणालाच मान्य नाही.
एलबीटीत अनेक विसंगती तो भ्रामक असल्याची बाब  महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही अवगत करण्यात आले.
भाजपने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एलबीटी समाप्त करण्यास बाध्य करावे, अशी अपेक्षा ‘एनव्हीसीसी’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुंबईत राज्यातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची (फॅम) बैठक झाली. संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यात घेण्यात आला.
यासंदर्भात १ मे रोजी मुंबईत पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात पुढील रणनीती ठरणार आहे. समाजवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘एलबीटी’ विरोधात सोमवारी पुतळा जाळला.

Story img Loader