महाराष्ट्र शासनाने सुगंधित सुपारी, तंबाखूवर लागू केलेल्या बंदीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी व शहर पानठेला असोसिएशनने व्यापार बंद ठेवला आहे. शहरात जवळपास ८ हजार पानठेले आहेत. या पानठेल्यांवर सुगंधित तंबाखू, सुपारीची विक्री करण्यावर शासनाने बंदी आणली. शासनाच्या बंदीमुळे पानठेल्यांच्या भरवशावर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस संपूर्ण व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन व्यापारी संघाचे केदार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानुसार आज विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पाळला. केदार शर्मा म्हणाले, तंबाखू, जर्दापेक्षाही सिगरेट आरोग्याला सर्वात जास्त धोकादायक आहे. शासन त्याच्या बंदीवर विचार का करीत नाही. ज्या धंद्यात गरीब आहेत त्यांच्या कुटुंबाच्या भरणपोषणाच्या साधनांवर सरकार बंदी का आणते. सुपारी व तंबाखू प्राचीन काळापासून सेवन करण्यात येते मग आजच त्यावर बंदी घालणे अयोग्य आहे. महाराष्ट्र शासनाने त्वरित ही बंदी उठवून लोकांवरील उपासमारीची वेळ टाळावी, असे आवाहन केदार शर्मा यांच्यासह संजय मांडवगडे, भारत, दिनेश मानकर यांच्यासह नागपूर पानठेला असोसिएशनने केले आहे.
शाळकरी मुले आणि तरुण मुलांमधील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन शासनाने तंबाखू, सुगंधीत सुपारी आणि तत्सम पदार्थावर बंदी आणली होती. हे सर्व पदार्थ शाळा, महाविद्यालयांच्या आजूबाजूला सहज पानठेल्यावर मिळत असल्याने विद्यार्थी सहज एकमेकांचे अनुकरण करीत व्यसनांच्या आहारी जात आहेत. तरुण पिढी अशी व्यसनाधीनतेकडे जाऊ नये म्हणून अनेक सेवाभावी संघटनांनी आवाज उठवला होता. म्हणूनच शासनाने तंबाखू, सुपारी, जर्दा यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader