चार महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उद्यापासून (बुधवारी) बेमुदत संप पुकारला आहे. थकीत वेतन अदा केल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त सुधीर शंभकर मंगळवारपासून रजेवर गेले आहेत.
सरकारकडून मिळणारे सहायक अनुदान बंद झाले व महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकले नाहीत, या दुहेरी पेचात मनपासमोर आर्थिक संकट उभे राहिले. दिवाळीपासून वेतन थकले आहे. सेवानिवृत्तांना ८ महिन्यांपासून पेन्शन नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांपासून पगार नाही. महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन थकले. यासाठी ९ कोटी निधीची गरज आहे. मालमत्ता करातून साडेतीन कोटी जमा झाले. त्याचा विनियोग कुठे झाला हे कळायला मार्ग नाही. पगार मिळण्यासाठी १३ पासून काम बंद करण्याची नोटीस कर्मचारी संघटनेने बजावली होती.
आयुक्त शंभरकर यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. रात्री उशिरापर्यंत उपायुक्त दीपक पुजारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. बोलणी फिस्कटल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने जाहीर केला. बैठकीस संघटनेचे के. के. आंधळे, मुक्सीद खान, अनसूया जोगदंड, माणिक बोराडे, के. के. भारसाकळे, काशिनाथ उबाळे, दादाराव राक्षे, दत्ता खंदारे, मधुकर डहाळे आदी उपस्थित होते. उद्याच्या आंदोलनात लालबावटा संघटना सहभागी होणार असल्याचे कॉ. राजन क्षीरसागर यांनी सांगितले.

Story img Loader