स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी व राष्ट्रवादी जनरल कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी एमआयडीसी गेटसमोर धारीवाल कंपनीच्या विरोधात एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले.  धारीवाल पॉवर प्लँटच्या व्यवस्थापनाने एकूण रिक्तपदे, पदनिहाय संस्था व त्या पदास पात्र असलेली शैक्षणिक योग्यता जाहीर करावी, शासन निर्णयाप्रमाणे किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीत प्राधान्य द्यावे, स्थानिक उमेदवारांना नोकरी देताना जे कामगार या कंपनीत पूर्वीपासून काम करीत आहेत किंवा होते, अशा कामगारांना त्यांच्या पात्रतेनुसार सर्वप्रथम नोकरीत सामावून घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. धारीवाल पॉवर प्लान्टसोबतच स्थानिक बेरोजगारांना वर्धा पॉवर, जीएमआर, गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस, पुंज लॉयड, गोपानी या कंपन्यांमध्येही प्राधान्याने स्थान देण्यात यावे, अशीही मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्यात आली.

Story img Loader