स्थानिक शिवाजी हायस्कूलचे शिक्षक गणेश वसू यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची पोलीस विभागाने कोणतीही शहानिशा न करता केवळ दबावाखाली अॅट्रॉसिटी व विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल केल्याने या अन्यायाच्या निषेधार्थ विविध ११ शिक्षक संघटनांसोबतच युवाशक्ती संघटना, शिवसेना, भाजप, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आदींनी संयुक्तरित्या सोमवारी पुकारलेल्या गडचिरोली शहर बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने शिक्षक गणेश वसू यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार पोलिसात दाखल केली. ही विद्यार्थिनी शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. चालू शैक्षणिक सत्रात तिचे शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण कमी असल्याने तिला दहावीच्या परीक्षेला बसता येणार नाही व तिचे शैक्षणिक नुकसान होईल, या प्रामाणिक भावनेने वसू यांनी विद्यार्थिनीच्या पालकांना कळविले, परंतु पालकांनी मुलीचा विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनीही कोणतीही शहानिशा न करता एका संघटनेच्या दबावाखाली या शिक्षकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
विविध संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार शिक्षक वसू हे अत्यंत प्रामाणिक व शिस्तप्रिय शिक्षक असून पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवून अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात विविध संघटनांनी सोमवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला गडचिरोलीतील व्यापारी संघटनांसोबतच सर्व शैक्षणिक संस्थांनी बंद पाळून पूर्णपणे प्रतिसाद दिला. यासोबतच युवाशक्ती संघटना, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन, गडचिरोली जिल्हा शिक्षण संस्था मंडळ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षण भारती संघटना, प्रजासत्ताक शिक्षक संघ, म.रा. शिक्षक परिषद, महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदींनी बंदचे आवाहन केले होते. माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभिये व शिक्षक आमदार नागो गाणार हे देखील सोमवारी गडचिरोली येथे बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक गणेश वसू यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा