स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या ३२ व्यापारी संघटनांनी गुरूवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व उद्योजकांच्या निमा व अन्य संघटनांचा पाठिंबा राहणार नाही. या करास संबंधितांनी समर्थन करण्याची भूमिका घेतल्याने महाराष्ट्र चेंबरमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात शहरवासीय नाहक भरडले जाण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात २१ मेपासून स्थानिक संस्था कर लागू होत असून त्या दृष्टीने पालिकेची तयारी सुरू आहे. या करास ३२ हून अधिक व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
या सर्व संघटना गुरूवारपासून बेमुदत संपात सहभागी होणार असल्याची माहिती धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा व्यापार कृती समितीचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली. या कराचे समर्थन आणि विरोध करण्यावरून उद्योजक, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांमध्ये फूट पडून मतभेद निर्माण झाले आहेत.
उद्योजक व चेंबरच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या व्यापारी संघटनांनी व्यापार कृती समितीचे गठीत करून बेमुदत बंदची हाक दिली. या संदर्भात विविध संघटनांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. व्यापारी कोणत्याही परिस्थितीत ‘एलबीटी’ स्वीकारणार नसल्याचे संचेती यांनी सांगितले. शहर-परिसरातील ३२ व्यापारी संघटनांचा या करास विरोध आहे. त्यामुळे त्याची अधिकृत नोंदणी करण्याची सक्ती केली जाऊ नये, असे त्यांनी सूचित केले.
स्थानिक संस्था करात व्यापारी व छोटय़ा व्यावसायिकांवर ३९ अन्यायकारक तरतुदी लादण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अमर्याद अधिकार एकटवले जाणार असून त्यामुळे व्यापाऱ्यांची लूट व अडवणूक मोठय़ा प्रमाणावर होऊ शकते. यामुळे जकात आणि एलबीटी ऐवजी व्हॅटमध्ये एक ते दीड टक्का वाढ करण्यात यावी, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या आंदोलनास सुरूवात करण्यापूर्वी व्यापार कृती समितीच्यावतीने गुरूवारी सकाळी ९ वाजता रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची महाआरती करून बंदला सुरूवात करण्यात येईल. शुक्रवारी रविवार कारंजा परिसरात एलबीटी विरोधातील निषेध नोंदवण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बेमुदत संप यशस्वी होणार असल्याचा दावा संचेती यांनी केला आहे. शासन व महापालिका आणि व्यापारी वर्ग यांच्यातील मतभेदामुळे सामान्य ग्राहक बंदमुळे नाहक भरडला जाणार आहे.

Story img Loader