क्रिकेट सामन्यादरम्यान दगडफेकीचा प्रकार घडल्याप्रकरणी काँग्रेस नेते टी. पी. मुंडे यांच्या मुलासह अन्य काहीजणांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी मुंडे समर्थकांनी रस्त्यावर उतरत ‘बंद’ची हाक दिल्याने शहराची बाजारपेठ पूर्ण बंद होती. दरम्यान, ताब्यात गेतलेल्या दहाजणांना एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र, ही कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत बेमुदत बंद पाळण्याचा इशारा संध्याकाळी उशिरा देण्यात आला.
परळीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मुंडे यांचा मुलगा प्रदीप याने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. यात अनेक गाडय़ा व पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान झाले. प्रदीप मुंडेसह दहाजणांवर पोलीस निरीक्षक सुरेश डांगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. परंतु रात्री झालेली ही कारवाई पोलिसांनी एकतर्फी व जाणूनबुजून केल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी मुंडेसमर्थक रस्त्यावर उतरले. दाखल गुन्हे मागे घ्या, अशी मागणी करत प्रा. मुंडे यांच्यासह समर्थकांनी शहर ‘बंद’ची हाक दिली. त्यामुळे शहरातील बाजारपेठ बंद राहिली.
शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सहायक पोलीस अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक स्वाती भोर यांनी शहरात तळ ठोकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा