विभागात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ३० जागा रिक्त असूनही कामकाज सुरळीत सुरू आहे. असे असतानाही उपजिल्हाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. विभागीय आयुक्तांनी हा प्रकार सुरू ठेवल्यास याचा परिणाम उपजिल्हाधिकारी अधिवेशनादरम्यान रजेवर जातील, असा इशारा विदर्भातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या संघटनेने विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांना दिला आहे.
वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर प्रथमच अशा प्रकारचा आरोप राज्यातील प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांनी लावल्यामुळे विभागीय आयुक्तालयात चर्चेला ऊत आला आहे. विभागीय आयुक्त विभागातील सर्वच उपजिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप महाराष्ट्र नागरी सेवा अधिकारी संघटनेने केला आहे. निवृत्त उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात येऊन त्यासंबंधी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले. याची एक प्रत राज्याचे मुख्य सचिव डॉ. जयंतकुमार बांठिया यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे. विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांची ३० पदे रिक्त आहेत.
गोपाल रेड्डी यांना ही पदे भरून घेता आलेली नाहीत तसेच या प्रकरणाचा त्यांनी हवा तसा पाठपुरावाच केला नाही. सध्या कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांवरील कामाचा भार बघता विभागातील कामे अतिशय सुरळीत सुरू आहे, अशी माहिती राजेंद्र कानफाडे यांनी दिली.

आयुक्तांनी बोलणे टाळले
याविषयी विभागीय आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर बोलण्याचे टाळले. विभागातील अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांचे काम अपेक्षेनुसार नाही. त्यांना तंत्रज्ञान हाताळता येत नसून जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Story img Loader