वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ही हल्ली फॅशन झाली आहे, पण ही फॅशन जीवावर बेतणारी आहे, हे आजच्या तरुणाईला ठावूक नाही. यात फक्त तरुणाईलाच दोष देऊन चालणार नाही, तर सर्वच स्तरातील लोक वाहतुकीच्या या नियम आणि कायद्याचा भंग करतात. याचा वेध लोकसत्ताने ‘भन्नाट वाहने अन् कानाला मोबाईल’ या वृत्ताच्या माध्यमातून घेतला होता. त्यावर ईमेल, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी. वाहन चालवताना लोक थुंकतात, गाडी नीट लावत नाहीत. अशांच्या विरोधातसुद्धा कठोर कारवाई करून वाहतूक परवाना रद्द करायला हवा. फार कमी व्यक्ती वाहतूक नियमांचे पालन करतात, अधिकाधिक लोक वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवतात. वाहतूक पोलिस असेल तेव्हाच लोक सिग्नलवर थांबतात. कधी कधी तर वाहतूक पोलिस असूनसुद्धा सिग्नल तोडतात. व्यवस्थेत बदल प्रत्येकाला हवा आहे, पण स्वत:ला बदलायला कुणीही तयार नाही. मोबाईलने आयुष्य सरळसोपे बनवले आहे, पण वाहन चालवताना फोनवर बोलणे आयुष्याला मारक ठरत आहे. त्यामुळे इतकेच महत्त्वाचे असेल तर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून बोलण्याचा सल्ला मी अशा वाहनचालकांना देईल, अशी प्रतिक्रिया अंकिता दखणे या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
चंद्रपूरला मागील आठवडय़ात वाहनांची गती, हॉर्न, मोबाईल फोनचा वाहनांवर वापर आदी विषयांवर वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. ते प्रयत्न करतात, पण नागरिक ऐकत नाही, असे सहज उत्तर त्यांनी दिले. पोलिसच असे हतबल होऊन उत्तर देत असतील तर नियम तोडणाऱ्यांना काय म्हणणार, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर येथील प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हे दृश्य सगळीकडेच पहायला मिळते. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच असते. तसेच या तरुणाईचे झाले आहे. त्यांना कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत. अशाप्रकारचे लिखाण बघून तरी त्यांच्या डोक्यात फरक पडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, असे मत सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.
युवकांनी कायदे आणि नियमांचे पालन करायलाच हवे. ते केले नाही तर अपघातांचे प्रमाण वाढते. आजचा युवक उद्याचे भविष्य आहे आणि त्यांच्यात शिस्तप्रियता असायलाच हवी. पोलिसांचा किंवा प्रशासकीय यंत्रणेचा मान राखायलाच हवा आणि त्यांनीही युवकांना योग्य ती दिशा दाखवायला हवी, असे मत अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी व्यक्त केले. वाहन चालवताना सर्रासपणे बोलणारी तरुणाई वाहतूक पोलिसांच्या समोरून निघून जाते, पण पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतात. या सर्व प्रकाराला आळा घालायचा असेल तर त्यांचीच भूमिका महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे, तर नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून वागायला हवे, असे मत प्रशांत देसाई यांनी व्यक्त केले.
‘भन्नाट वाहने अन् कानाला मोबाईल’
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ही हल्ली फॅशन झाली आहे, पण ही फॅशन जीवावर बेतणारी आहे, हे आजच्या तरुणाईला ठावूक नाही.
आणखी वाचा
First published on: 16-09-2014 at 07:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action on mobile users while driving