मुंबईची लोकसंख्या आणि वाहनसंख्या यांचे वाढते प्रमाण अत्यंत व्यस्त असून त्यावर गंभीरपणे विचार झाला पाहिजे. त्यासाठी कठोर उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहेच. पण त्याचबरोबर प्रवाशांची मानसिकता बदलण्याचीही गरज असल्याचे मत परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आप्पा पेंडसे स्मृती व्याख्यानामध्ये ‘मुंबईची वाहतूक समस्या’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. मुंबईची वाहतूक समस्या ही न सुटणारी असली तरी लवकरच ती किमान २० ते २५ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी प्रवाशांच्या मानसिकतेतही बदल होण्याची गरज आहे, असे या दोघांनी सांगितले.
जनतेच्या वाहतूक पोलिसांकडून अवास्तव अपेक्षा असतात, असे सांगून सहआयुक्त फणसाळकर यांनी सांगितले की, जेजे फ्लायओव्हरच्या रचनेमुळे दुचाकीस्वारांच्या जिवाला धोका असल्याचे सांगूनही लोक ते मानत नाहीत. प्रत्येक सिग्नलवर पोलीस ठेवावेच लागतात आणि सुविधा असूनही त्याचा वापर न करणारी जनता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असेही ते म्हणाले. स्कायवॉकवरून प्रवास करण्याऐवजी त्यावर प्रदर्शने भरविण्याची मागणी करण्यात येत आहे. वारंवार सांगूनही रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. गाडय़ा थांबल्या तर लगेच दगडफेक करणे ही कृतघ्नता नव्हे काय, असा सवाल त्यांनी केला.
रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली असली तरी रस्त्यांचे क्षेत्र तितकेच राहिले आहे. जनतेची क्रयशक्ती जास्त असल्यानेच वाहतूक समस्या वाढली, असे सांगून परिवहन आयुक्तांनी सांगितले की, उदारीकरणामुळे माणसांचे उत्पन्न वाढले तरी वाहनांच्या किमती तितक्या प्रमाणात वाढलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनांची खरेदी मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आली. बेस्टसारखी प्रभावी आणि वक्तशीर वाहतूक व्यवस्था मुंबई शहरात आहे. मुंबईमध्ये नव्या वाहनांची नोंदणी थांबविण्याचा प्रयत्न झाला तरी बाहेरून येणाऱ्या वाहनांना रोखणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहनांना सवलती आणि खासगी वाहनांना बंधने असा विचार केला तर शहरातील वाहतूक समस्या मोठय़ा प्रमाणात सुटू शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार संघाच्या वतीने संगणकतज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी या वेळी मुंबईकरांच्या समस्या मांडल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा