येथे नगरपरिषद स्थापन व्हावी या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) सोमवारी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडे बाजाराचा दिवस असूनही शहरातील व्यवहार पूर्ण बंदच होते. एकीकडे हे आंदोलन आणि दुसरीकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी डफडे मोर्चा काढल्याने शहर आज आंदोलनांनीच दणाणून गेले.
येथे नगरपरिषद स्थापन करावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी चार दिवसांपासून नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. सलगच्या उपवासामुळे २३ कर्मचा-यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तेथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रशासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आरपीआयने आज कर्जत बंदची हाक दिली होती.  
सकाळी ११ वाजता आरपीआयच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात निळकंठ ठोसर, प्रताप भैलुमे, दत्ता कदम, सचिन कदम, विशाल काकडे आदी सहभागी झाले होते. तहसीलदार पोपट कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.
व्यापा-यांची नाराजी
बंदच्या पार्श्र्वभूमीवर आज सकाळी शहरातील सर्व व्यापारी बाजारतळ येथे जमले होते. या वेळी अनेकांनी बंद ठेवताना व्यापा-यांना विचारात घेतले जात नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली. राजकीय पक्ष व विविध संघटना सतत बंद करून व्यापा-यांना वेठीस धरतात अशा भावनाही व्यापा-यांनी या वेळी व्यक्त केल्या.

Story img Loader