जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रवाहिनीवरून दिले. मात्र, केंद्रेकर यांना रुजू केले जाईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवून गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठ बंद राहिली. शहरात ठिकठिकाणी मोर्चे निघाले, रास्ता रोको झाला. बदलीच्या विरोधात पुकारलेल्या ‘जिल्हा बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात प्रथमच ‘बंद’ व सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र या निमित्ताने दिसले.
जिल्हाधिकारी केंद्रेकर दीड महिन्याच्या प्रशिक्षणानंतर परत आले. गुरुवारी ते रुजू होणार होते. मात्र, तत्पूर्वीच मंत्रालयातून त्यांना रुजू न होण्याचे तोंडी आदेश बजावण्यात आले. राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांनी एकत्र येऊन राजकीय वजन वापरून प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचे उघड झाले. केंद्रेकर यांच्या बदलीचे वृत्त येताच सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रेकर यांची बदली झाली नसल्याचे स्पष्टीकरण देऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्रेकर बीडमध्ये रुजू होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊपासून भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलन समिती, शिवसेना, भाजपा, मनसे, छावासह विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे रमेश पोकळे, राजेंद्र बांगर, मनसेचे अशोक तावरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
भाजीमंडई, मुख्य बाजारपेठ पूर्ण बंद राहिली. केंद्रेकरांची बदली रद्द करा, केंद्रेकरच पाहिजे अशा घोषणा देत, राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी शिमगा केला. बीड शहराबरोबरच चौसाळा, नांदूरघाट, नेकनूर, येळंब या गावांतही उत्स्फूर्त ‘बंद’ पाळण्यात आला. अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, धारूर, परळीतही भाजप, शिवसेनेसह विविध पक्ष, संघटनांनी ‘बंद’ पाळला. जनतेनेही प्रथमच उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त होता. सरकारी कार्यालयात तुरळक उपस्थिती वगळता बहुतांशी ठिकाणी कामकाज बंद राहिले. गुरुवारी बारावीची परीक्षा सुरू झाली. आंदोलनकर्त्यांनी या परीक्षेवर कुठलाही परिणाम, तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास उद्यापासून (शुक्रवार) तालुका तहसीलवर निदर्शने, मेणबत्ती मोर्चा, भजन रॅली अशा प्रकारे आंदोलन सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती अॅड. अजित देशमुख यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा