राष्ट्रपतींकडे मागितली परवानगी
शहराजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) इंधन वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपाने मंगळवारी २७वा दिवस पूर्ण केला. आपल्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासन, कंपनी प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक पाहिले जात नसल्याच्या निषेधार्थ वाहतूकदारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे संपकऱ्यांनी तसे निवेदन दिले आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलियम विभागाने आणि बीपीसीएल कंपनीने पानेवाडी येथे निवासी क्षेत्रात इंधन प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करून प्रकल्प उभारला. प्रकल्पग्रस्तांना वाहतुकीच्या निविदेत प्राधान्य देऊन त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांनी कर्ज काढून, उधार उसनवार पैसे घेत टँकर खरेदी केले. पण गेल्या दोन वर्षांपासून कंपनीने वाहतूकदारांची अडवणूक सुरू केली आहे. शेजारील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल वाहतूकदारांना योग्य मोबदला देत आहेत, परंतु बीपीसीएल योग्य मोबदला देत नसल्याने वारंवार इंधन वाहतूकदारांना संप करावा लागत आहे. वाहतूक दरात वाढ करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा वाहतूकदारांनी संप सुरू केला. कंपनीचे संचालक, वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे विविध अधिकारी, मंत्री, खासदार, आमदार या संपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. वाहतूकदारांच्या संपामुळे १७६ टँकर मालक, त्यावर अवलंबून असलेले चालक, क्लीनर अशा सुमारे १५०० कुटुंबांची उपासमार सुरू आहे.
राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनावर नाना पाटील, सचिन गवळी, संजय पांडे, अभय माले, दत्तू शेळे आदींसह २९ वाहतूकदारांच्या स्वाक्षरी आहेत.

Story img Loader