ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या रकमेचा पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी पंचायत समितीचे सभापती व शेतकरी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्यासह आठ संचालक व शेतकऱ्यांनी राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्यासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.
उपोषणात देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व संचालक बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर कोळसे, भगवान कोळसे, अर्जुन जाधव, निवृत्ती आढाव, सुभाष करपे, नितीन ढोकणे या संचालकांसह शेतकरी सहभागी झाले आहेत.
तनपुरे कारखान्याचा गळित हंगाम सुरू होऊनही अद्याप शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता देण्यात आलेला नाही. उस गळिताला गेल्यानंतर १५ दिवसाच्या आत उसाचे पैसे अदा केले पाहिजेत. अन्यथा संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाते. साखर आयुक्तांकडून अशी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मागिल दोन हंगामातील उसाचे पैसेही व्यवस्थापनाकडे रखडले आहेत. कारखाना मालकीच्या जमिनीची विक्री करण्यात आली तसेच साखर विक्री करून पैसे जमा झाले. त्या १८ कोटीचा हिशेब अद्याप व्यवस्थापनाने दिला नाही. ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा गाडे यांनी दिला आहे.
तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी उस भावाच्या प्रश्नासंदर्भात खुलासा केलेला नाही. तर विकास मंडळाचे नेते रामदास धुमाळ तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे समर्थक या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. तहसीलदार गिते यांनी आंदोलकांची भेट घेतली. परंतु उपोषणाबाबत रात्री उशिरापर्यंत तोडगा निघालेला नव्हता.
कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दि. ७ पुर्वी ऊस बिलाची रक्कम देण्यात येणार असल्याचा खुलासा पत्रक काढून केला आहे. कारखाना गोदामात ५२ कोटी किमतीची एक लाख ७० हजार पोती साखर शिल्लक आहे. यावर्षीच्या उसाला २ हजार २०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट दिले जाणार आहे, असा खुलासा केला आहे.

Story img Loader