‘मी सिंधुताई सपकाळ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाने मराठीमध्ये दिग्दर्शक म्हणून पाय रोवणारे अनंत महादेवन यांची टीव्ही, हिंदी सिनेमातली कारकीर्द प्रदीर्घ आहे. आगामी ‘गौर हरी दास्तान’ आणि ‘उचल्या’ हे चित्रपट ते करीत आहेत. बॉलीवूड, एकूण भारतीय सिनेमा, तसेच जागतिक सिनेमाविषयी त्यांनी व्यक्त केलेली परखड मते..
‘बाजीगर’, ‘इश्क’ हे हिंदी चित्रपट, तर दूरदर्शनवरील ‘टिपू सुलतान’सारख्या मालिकेमध्ये चांगल्या भूमिका मिळाल्या असे मी म्हणेन. मुळातच निर्माते-दिग्दर्शकांनी मला आपणहून भूमिकांसाठी निवडले. माझ्यातील अभिनय गुणांच्या जोरावर मी अभिनेता झालो. हिंदी सिनेमात अन्य कुणाचीही मदत न घेता स्वत:च्या अभिनय सामर्थ्यांवर मला भूमिका मिळत गेल्या त्या मी माझ्या पद्धतीने केल्या. गुणवत्तेची कास कधीही सोडली नाही. दिग्दर्शक-लेखक म्हणून केलेल्या चित्रपटांमध्येही गुणवत्ता, दर्जा याबाबत तडजोड न करता काम करीत आलो आणि काम करीत राहीन. अर्थात श्याम बेनेगल, ऋतुपर्णो घोष, अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्या दिग्गजांच्या चित्रपटात अधिक आव्हानात्मक भूमिका करायला मला नक्कीच आवडले असते. लेखन-दिग्दर्शन-अभिनय यापैकी काय आवडते असे विचारले तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी घट्टपणे निगडित आहेत. भूमिका, कथा चांगली असेल, पटकथा आव्हानात्मक असेल तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय करणेही तितकेच आव्हानात्मक ठरते. सिंधुताई सपकाळ, गौर हरी दास या हाडामांसाच्या व्यक्तींचा संघर्ष, त्यांनी मिळविलेले यश, ते जगले तो अनुभव यातच इतके नाटय़ आहे की, कोणत्याही काल्पनिक कथानकापेक्षा या जिवंत व्यक्तींवर चित्रपट करणे आणि त्याद्वारे ठोसपणे प्रेक्षकांना विचार देणे, काही सांगणे हे मला अधिक भावते. कोणत्याही काल्पनिक ‘मेलोड्रामा’पेक्षा ते नक्कीच अधिक भावते. म्हणून मला त्या पद्धतीचे चित्रपट करावेसे वाटतात.
सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात जे कधीच घडत नाही, घडणार नाही ते हिंदी सिनेमा दाखवतोय. बॉलीवूड सिनेमा किंवा हिंदी सिनेमा म्हणजे भारतीय सिनेमा नव्हे. परंतु, दुर्दैवाने जगभरात हिंदी सिनेमा म्हणजेच भारतीय सिनेमा असा प्रचार केला जातोय. भारतीय सिनेमा म्हणजे मराठीसह मल्याळम, कन्नड, बंगाली या भाषांमध्ये बनणारे चांगले सिनेमे होय. सशक्त पटकथा, उत्तमोत्तम विषय, वास्तवाच्या जवळ जाणारे विषय या प्रादेशिक सिनेमांतून हाताळले जात आहेत तो खरा सिनेमा आहे. भारतीय सिनेमातील हिंदी सिनेमा माझ्या मते याबाबतीत खूप कमकुवत आहे, असे म्हणावेच लागेल. जी माणसं साधेसरळ जीवन जगतात त्यातही प्रचंड नाटय़, प्रचंड मोठा संघर्ष असतो, ते जसेच्या तसे नीट पद्धतीने मांडले तरी त्याला वैश्विक दर्जा मिळतो. मराठी सिनेमात गेल्या काही काळापासून खूप चांगल्या पटकथा, उत्तम कलावंत दिसत आहेत. गिमिक्स करून, स्टार कलावंतांच्या जोरावर बनणारा हिंदी सिनेमा हा तद्दन गल्लाभरू सिनेमाची निर्मिती करतो. लोक हिंदी सिनेमात फक्त कलावंत, त्यांचे कपडे, गाणी, नृत्य पाहायला जातात, ‘सिनेमा’ पाहायला जातच नाहीत. प्रादेशिक भारतीय चित्रपट हे बॉलीवूडच्या खूप पुढे गेले आहेत. अस्सल चित्रपटकर्त्यांला बॉलीवूडमध्ये वाव मिळत नाही. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. परंतु त्याची साधी दखलही अनेक इंग्रजी माध्यमांनी घेतली नाही.
जगभरातील सिनेमा पाहिले तर सहजपणे लक्षात येईल की, छोटय़ा-छोटय़ा प्रादेशिक विषयांवरील गोष्ट अशा पद्धतीने पडद्यावर मांडली जाते की त्याचा वैश्विक स्तरावर गौरव होतो. इराणमधील एका कुटुंबाची गोष्ट मानवी भावभावनांचा असा कल्लोळ मनात उठविते की, दूर युरोप-अमेरिकेतील लोकांच्याही हृदयाला हात घालण्याची ताकद त्यात असते. मलासुद्धा भारतीय सिनेमाला अशा आंतरराष्ट्रीय आणि खऱ्या अर्थाने ‘वैश्विक’ स्तरावर न्यायचे आहे. शंभर कोटी क्लबपेक्षा शंभर वर्षांतील संस्मरणीय सिनेमांच्या क्लबमध्ये माझ्या सिनेमाचा क्रमांक लागला तर ते मला अधिक आवडेल. फक्त पैसा कमाविणे, स्टार कलावंतांच्या लोकप्रियतेवर सिनेमा काढण्यापेक्षा सकस, साध्याच पण सर्वसामान्य लोकांसह जगभरातील सर्व लोकांच्या मनाला भिडणारा सिनेमा करणे आव्हानात्मक आहे. मनाला भिडणारा विषय हाच खरा सिनेमाचा ‘हीरो’ असला पाहिजे.
हिंदी सिनेमा म्हणजे भारतीय सिनेमा म्हणून डंका पिटला जातो. त्यामुळे दिशाभूल होतेय. कानसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकाच चित्रपटकर्त्यांचे तीन सिनेमा कसे काय निवडले जातात. आपल्याकडे सध्या बॉलीवूडमध्ये निघत असलेल्या ‘जरा हटके’ म्हणविणाऱ्या सिनेमांबाबत विचाराल तर ते काही ‘न्यू वेव्ह’मधील सिनेमा नक्कीच नाहीत. टेरेन्टिनो किंवा युरोपमधील काही देशांमधील दिग्दर्शकांचे सिनेमे पाहून त्यांची स्टाईल चोरून बनविलेले हे सिनेमे आहेत. ही न्यू वेव्ह नाही, हे सिनेमे अपूर्ण आहेत असे म्हणावे लागेल. नवीन ‘गोलमाल’, ‘बोलबच्चन’ किंवा अशा पद्धतीची ‘सर्कस’ ज्यांना करायची आहे त्यांनी करावी. त्यांना फक्त कोटय़वधी पैसा कमावून १०० कोटी क्लबमध्ये जायची घाई लागलीय. मला मात्र ‘सिनेमा’ बनवायचाय. न्यू वेव्ह हिंदीत आलीय हे म्हणणे गैर होय. सत्यजित राय, श्याम बेनेगल, मृणाल सेन, व्ही. शांताराम, गोविंद निहलानी, मणी कौल यांसारख्या दिग्गजांनी बनविलेले ‘पाथेर पांचाली’, ‘मंथन’, ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘दुविधा’, ‘मृगया’ यांसारखे चित्रपट हेच ‘न्यू वेव्ह’मधील आहेत. भारतीय सिनेमाचा जगासमोरील चेहरा ठरतील असा वैश्विक सिनेमा मला बनवायचा आहे. आगामी ‘गौर हरी दास्तान’ या सिनेमाचे निर्मितोत्तर काम सुरू असून सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा मानस आहे. लक्ष्मण गायकवाड यांच्या ‘उचल्या’ कादंबरीवर मराठी सिनेमा आपण करणार आहोत. एका मोठय़ा वर्तुळामध्ये ९९ टक्के जागा गल्लाभरू चित्रपटांनी व्यापली असली तरी एका छोटय़ा कोनाडय़ात माझ्यासारख्या चित्रपटकर्त्यांसाठी जागा आहे. ती जागा आगामी दहा वर्षांनंतर मोठी झालेली लोकांना दिसेल.

Story img Loader