राहुल गांधींच्या दृष्टीने सत्ता हे विष असेल, तर त्यांनी एखादी स्वयंसेवी संस्था काढून समाजसेवा करावी, असा टोला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी येथे पत्रकार बैठकीत लगावला. राहुल गांधी उत्सुक असले, तरी देशातील जनता त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यास उत्सुक आहे का? हेही तपासून पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला राज्यसभा खासदारकीचे आश्वासन दिले आहे, असे सांगतानाच महायुतीत राजू शेट्टी व महादेव जानकर यांचा समावेश झाला असला तरी रिपाइंची जागा फ्रंटवरच राहील, असा दावाही आठवले यांनी केला. रिपाइं प्रदेशाध्यक्ष रुपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे आदी या वेळी उपस्थित होते. महायुतीमध्ये महादेव जानकर व खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष दाखल झाला असला, तरी रिपाइं बॅकफुटवर जाणार नाही. आमची जागा फ्रंट फुटवरच असणार, असा दावाही आठवले यांनी केला. राहुल गांधींच्या तुलनेत मोदींचे नेतृत्व व्यापक व कणखर असल्याचे ते म्हणाले. आम आदमी पार्टीचा प्रभाव महाराष्ट्रात फारसा जाणवणार नाही. काही मते घेण्यात ‘आप’ यशस्वी होईल. परंतु महायुतीवर याचा काहीच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘सातवी नको, सहावी जागा हवी’!
राज्यात राज्यसभेच्या सातपकी सहावी जागा आपल्याला द्यावी. सातवी जागा घेण्यास आपण स्पष्ट नकार दिला आहे. याउपरही सातवी जागा देण्याचा प्रयत्न युतीकडून झाल्यास परराज्यातून राज्यसभेवर जाण्याचा पर्याय मोकळा असल्याचे आठवले यांनी सांगितले. राज्यसभेच्या जागांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मतदान होत आहे. २० जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

Story img Loader