दहावी आणि बारावीच्या निकाल लागून महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरी संदर्भातील प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे व महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्रस्त झाले आहेत. सेतू कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे या गैरसोयीमध्ये आणखीनच भर पडली आहे.
दहावी आणि बरावीचे निकाल लवकर लागले तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागत आहे. शहरातील काही शाळांमधून दाखले आणि प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांनी दिले होते मात्र, त्याची अंमलबजावणी काही निवडक शाळांमध्ये केवळ एका दिवसासाठी करण्यात आली. याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. परिणामी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अकरावीची प्रवेश प्रक्रि या प्रारंभ सुरू झाल्यानंतर केवळ जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे. संपूर्ण कागदपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांचा अर्ज महाविद्यालयात स्वीकारला जात नाही. अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमाचा अर्ज स्वीकृतीचा आज शेवटचा दिवस होता. अनेकांना प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू केंद्रात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची सकाळपासून गर्दी दिसून येत आहे. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर अधिकाऱ्यांची स्वाक्षरीसाठी विद्यार्थ्यांना दोन दोन दिवस वाट पहावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक आहेत.
सेतू कार्यालयातून जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वयाची प्रमाणपत्र व अन्य महत्त्वाची कागदपत्र उपलब्ध करून दिली जातात. सध्या ही कागदपत्र मिळविण्यासार्ठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतूच्या कार्यालयाबाहेर रांगा लागलेल्या दिसतात. सेतू केंद्रामध्ये पुरेसे कर्मचारी तसेच महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी स्वाक्षरी करण्यासाठी वेळेत उपलब्ध होत नसल्याची अनेकांची तक्रार आहे.
सकाळी आठ वाजेपासून लोक रांगेत लागलेले असतात. दोन ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा कुठलेही कागदपत्र नसेल तर संबंधित विद्यार्थ्यांला परत पाठविले जाते.
अनेक लोक तर सेतू केंद्रात असलेल्या कर्मचाऱ्यांचा ओळखीचा फायदा घेत आतमध्ये जाऊन कामे करवून घेत आहेत. मात्र, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांना मात्र रांगेत ताटकळत राहण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या अनेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून महाविद्यालयात आवश्यक प्रमाणपत्रे दिल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जात नाही. महाविद्यालयात प्रवेशाबरोबर वय व रहिवासी प्रमाणपत्र दाखल करा, अशा महाविद्यालयांच्या सूचना आहेत. मात्र शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा