स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे विविधांगी पैलू उलगडण्याच्या उद्देशाने मुंबईच्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेले आणि मध्यंतरी कुशल मनुष्यबळाअभावी सुमारे पाच वर्ष बंद असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर’ या मासिकाचे पुन्हा एकदा पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सावरकरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या नाशिकमध्ये ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलन’चे आयोजन करण्यात येत असताना अभ्यास मंडळाने सावरकरांचे विचार नवीन पिढीला देण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर’ हे मासिक पुन्हा सुरू करण्याची धडपड सुरू केल्याचे अधोरेखीत झाले आहे.
सावरकर यांचे विचार, तत्वज्ञान, राष्ट्रहितैशी भूमिका, विज्ञाननिष्ठ पैलू नवीन पिढीसह तळागाळातील घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. खुद्द सावरकर यांच्या साहित्य लेखनाचा आवाका ११ हजार पृष्ठसंख्येपर्यंत आहे. सावरकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबिरे, कार्यशाळा, साहित्य संमेलन आदी उपक्रम राबविले जातात. साधारणत: नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २००४ मध्ये त्यास मासिकाची जोड देण्याची संकल्पना विद्यमान अध्यक्ष शंकरराव गोखले यांनी मांडली आणि सावरकर हेच केंद्रबिंदू असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर’ या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. २१ मार्च २००४ रोजी ‘स्वातंत्र्यवीर’च्या पहिल्या अंकाचे मुंबईत प्रकाशन झाले. तेव्हापासून सुरू झालेला हा उपक्रम पुढील चार वर्ष अव्याहतपणे सुरू होता. अल्पावधीतच मासिकाला १३०० पेक्षा अधिक वर्गणीदार लाभले. स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना शब्दबद्ध करण्याची जबाबदारी या काळात एकखांबीपणे गोखले यांनी पेलली. तथापि, या कामात त्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची वानवा भासत होती. प्रत्येक महिन्यात प्रकाशित करावयाचे मासिक तितक्याच तोलामोलाचे होण्यासाठी मंडळास कार्यकर्त्यांचे बळ कमी पडू लागले. कार्यकर्त्यांची उणीव आणि मंडळाचे पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याने कामासाठी समन्वय साधताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आर्थिक टंचाई नसताना देखील मंडळास नाईलाजास्तव ‘स्वातंत्र्यवीर’ मासिक बंद करण्याच्या निर्णयाप्रत यावे लागले. २००७ मध्ये ‘मासिकाला काही अपरिहार्य कारणास्तव स्थगिती’ देण्यात येत असल्याचे मंडळाने जाहीर करत ‘स्वातंत्र्यवीर’ हा दिवाळी विशेषांक नियमितपणे प्रसिद्ध करण्याची ग्वाही वाचकांना दिली. तेव्हापासून ‘स्वातंत्र्यवीर’ मासिक स्वरूपात प्रकाशित होत नसले तरी वर्षांतून एकदा दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो.
‘स्वातंत्र्यवीर’ मासिक बंद करण्याच्या निर्णयावरून वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या मासिकाला स्थगिती दिली जाऊ नये, असा त्यांचा आग्रह होता. परंतु, मंडळाची अडचणच वेगळी असल्याने सुमारे पाच वर्ष मासिक स्वरूपात स्वातंत्र्यवीर प्रकाशित होऊ शकले नाही. अल्पावधीत या मासिकाशी ऋणानुबंध जोडणाऱ्या वाचकांसाठी ‘स्वातंत्र्यवीर’ पुन्हा एकदा
आणण्याची मनिषा मंडळाचे अध्यक्ष गोखले यांनी व्यक्त केली आहे. या मासिकाच्या संपादन व इतर कार्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे. या कार्यकर्त्यांच्या सोबतीने मंडळाने शक्य तितक्या लवकर ‘स्वातंत्र्यवीर’ पुन्हा मासिक स्वरूपात प्रकाशित करण्याची तयारी सुरू केली आहे. साधारणत: पुढील वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर’ पुन्हा एकदा वाचकांना राष्ट्रप्रेमी विचार देण्यास सज्ज होईल, असे गोखले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा