एका बाजूला समांतर प्रकल्पास अमेरिकेतील कंपनी पुरस्कार देते. तो घेण्यास जाताना महापौरांच्या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जाते. त्याच वेळी समांतर योजना वाचावी, या साठी खासदार चंद्रकांत खैरे मात्र दिल्लीदरबारी धावाधाव करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. समांतर योजनेतील तांत्रिक अडचणी व निधीसाठी खैरे यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. मंगळवारी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचीही भेट घेऊन प्रकल्प पूर्ण होण्यास मदत करावी, अशी विनंती केली. केंद्राचा निधी पुन्हा मिळणे शक्य नाही, त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होईल, या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचा दावा खैरे यांनी केला. समांतर पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे ही योजना गुंडाळली जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. विशेषत: खासदार खैरे व त्यांचे समर्थक ही योजना सुरू राहावी, या साठी रणनीती आखत होते. खैरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन योजनेविषयीची माहिती दिली. मंगळवारी शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. समांतर पाणीपुरवठा योजना ही शहरवासीयांची गरज असून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, कंत्राटदाराचा करारनामा रद्द न करता करारनाम्यातील अटी व शर्तीची पूर्तता कंत्राटदाराकडून करून घेतली जाईल. मात्र, हा प्रकल्प रद्द होणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंती खैरे यांनी केली.गेल्या दोन वर्षांपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. ही योजना सुरू करणे गरजेचे आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे नव्याने येणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्री कॉरिडोरच्या पाश्र्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, अशी विनंती करण्यात आली. या प्रकरणी सकारात्मक चर्चा झाली असून कंत्राट रद्द न करता योजना पूर्ण करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी दिल्याचा दावा खैरे यांनी केला.

Story img Loader