मनसेचे चार, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस दोन, अपक्ष व सेना प्रत्येकी एक सदस्य जाहीर
महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये शिरकाव करण्यासाठी चाललेल्या धडपडीचा एक अध्याय गुरूवारी पूर्णत्वास गेला. शिवसेनेत या कारणावरून इच्छुकांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले आणि त्याचा परिणाम ही प्रक्रिया काही तास लांबण्यात झाला. स्थायी समितीच्या सदस्यपदी मनसेचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेसचे दोन तर अपक्ष व शिवसेनेच्या प्रत्येकी एक अशा एकूण ११ सदस्यांची नांवे महापौरांनी जाहीर केली. दरम्यान, पालिकेत सत्ताधारी असूनही या तिजोरीच्या चाव्या गेल्यावेळी गमावाव्या लागलेल्या मनसेने आता स्थायी काबीज करण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची रणनिती आखली आहे.
स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी गुरूवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेत सदस्यांची नांवे जाहीर करण्यास बराच विलंब झाला. स्थायी समितीवर मनसेकडून सुदाम कोंबडे, आर. डी. धोंगडे, पूनम ओहोळ, रेखा बेंडकुळे, काँग्रेसकडून अश्विनी बोरस्ते व शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हरिश भडांगे, कल्पना चुंबळे व सुनिता निमसे, अपक्ष गटातर्फे शबाना ताहिरखान पठाण आणि शिवसेनेकडून अॅड. शिवाजी सहाणे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. शिवसेनेकडून नांवे निश्चित होण्यास कालापव्यय झाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली गेली. मागील २८ तारखेला स्थायी समितीचे आठ सदस्य सोडत पद्धतीने निवृत्त झाले होते. त्यानंतर दामोदर मानकर व अजय बोरस्ते यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे स्थायीतील रिक्त झालेल्या ११ पदांसाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. गुरूवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत राजकीय पक्षांनी आपल्या सदस्यांची नांवे निश्चित करून देण्याची मुदत होती. त्यानुसार मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गटाने नांवे सादर केली असली तरी शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे त्यांच्या नावाचा घोळ अखेपर्यंत सुरू राहिला.
शिवसेनेकडून सदस्यपदासाठी अॅड. सहाणे, वंदना बिरारी, शैलेश ढगे, शोभा फडोळ, कोमल मेहोरोलिया, विलास शिंदे असे सहा जण इच्छुक होते. यावरून नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. गेल्यावेळी आपल्यास माघार घेणे भाग पाडल्याची तक्रार बिरारी यांनी केली. हा वाद मिटत नसल्याने अखेर बिरारी यांचे नांव निश्चित झाले. परंतु, त्यांना केवळ एक वर्षांसाठी नियुक्त केले जाईल असे सांगण्यात आल्याने त्यांनी माघार घेतली. त्यानंतर अॅड. सहाणे यांच्या नांवावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सेनेतील या वादामुळे सदस्य जाहीर करण्याची प्रक्रिया दीड तास विलंबाने पूर्णत्वास गेली.
दरम्यान, गतवेळी स्थायी समिती गमवाव्या लागलेल्या मनसेने आता ती ताब्यात घेण्याच्या दृष्टीकोनातून आकडेवारीचे समीकरण जुळविण्यास सुरूवात केली आहे. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी समीकरणांविषयीची चर्चा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत स्थायीत मनसेचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजप व काँग्रेस प्रत्येकी दोन तर अपक्ष गटाचे एक असे बलाबल आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास मनसे व भाजपचे मिळून दहा सदस्य होतात तर विरोधकांकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गट असे मिळून सहा इतके संख्याबळ होते. हे गृहीतक मांडून सत्ताधारी मनसेने स्थायीवर कब्जा करण्याच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून विरोधकांकडूनही कोणती समीकरणे कशी जुळविली जातात यावर बरेच काही अवलंबून आहे.

Story img Loader