शहरातील विविध वसाहतींमधील वीज भारनियमन लक्षात घेऊन धुळे महापालिकेला पाणी वितरणाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत दोन दिवसाआड म्हणजे दर तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागात भारनियमन सुरू आहे, तो कालावधी वगळून पाणीपुरवठा करणे पालिकेला भाग पडले आहे. भारनियमनातून पाणीपुरवठा योजनांना वगळण्यात आल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला तरी दुष्काळाच्या कचाटय़ात सापडलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारनियमनाचे असेही चटके सहन करावे लागत आहेत.
धुळे शहराला पाणी पुरविणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजना, नकाणे तलाव आणि डेडरगाव तलाव येथील वितरण व्यवस्थेचे नियोजन त्या त्या भागातील वीज भारनियमनाच्या वेळेवर करण्यात आले आहे. देवपूर भागातील काही वसाहती वगळता ९० टक्के परिसरात भारनियमन नाही. यामुळे त्या भागातील पाणी वितरण व्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा केला जात आहे, परंतु अन्य भागांत सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत साधारणपणे सहा आणि आठ तासांचे भारनियमन आहे. यामुळे भारनियमनाची वेळ वगळून पाणीपुरवठा केला जातो. सुकवद जलशुद्धीकरण केंद्रात चार, तर बाभळे जलशुद्धीकरण केंद्रावर तीन असे एकूण सात पंप पाणी वितरण व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत. तापी व हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रावर एक्स्प्रेस फीडर असल्यामुळे तेथे या समस्येला तोंड द्यावे लागत नाही.
पाणीपुरवठा योजनेस लागणाऱ्या विजेसाठी दरमहा तब्बल एक कोटी रुपये मोजले जातात. प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असताना ग्रामीण भागात भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागत आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर भारनियमनाचा परिणाम होऊ नये, याकरिता स्वतंत्र फीडर कार्यान्वित केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पाणीपुरवठय़ावर होत असल्याचे धुळे शहर उदाहरण म्हणता येईल. वीज भारनियमनाच्या वेळा लक्षात घेऊन पाणीपुरवठा करावा लागत असल्याने शहरवासीयांनाही पाण्यासाठी तिष्ठत राहावे लागत आहे.
चोपडय़ातही टंचाईच्या झळा
सातपुडय़ात पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने चोपडा तालुक्याला टंचाईची झळ बसली आहे. चोपडा शहर व तालुक्यातील दहा गावांत सद्य:स्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. चोपडा शहराला तापी नदीवरून दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात ३० कूपनलिकाही सुरू आहेत. मात्र कूपनलिकांचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपालिकेकडे नसल्याने काही भागांत धो-धो पाणी, तर काही परिसरांत पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. शहरात विनापरवाना खासगी कूपनलिका केल्या जात असूनही त्यावर पालिकेचे बंधन दिसत नाही. पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नव्या बांधकामांवर बंदी घातली गेली असताना शहरात सर्रासपणे कामे सुरू आहेत. पालिका प्रशासन निद्रावस्थेत असून पालिकांतर्गत कामेही वेगात असल्याचे लक्षात येते. पालिकेचे दुर्लक्ष व पाणी बचतीच्या उदासीनता यामुळे नासाडी मोठय़ा प्रमाणात होत आहे. तालुक्यात अद्याप एकाही गावात टँकर सुरू झाला नसला तरी मजरे हिंगोणे, अंमलवाडी, मोरचिडा, गौऱ्यापडाव, कृष्णापूर, चौगाव या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासत आहे. मौजे हिंगोणे येथे एक विंधन विहीर अधिग्रहित करून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीटंचाई जाणवत असलेल्या २२ गावांना कूलनलिका प्रस्तावित केल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. पुरातन उष्ण पाण्याचा झरा असलेल्या उनपदेवसह सातपुडय़ाच्या पायथ्याशी टंचाईचे संकट भेडसावत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा