रणरणत्या उन्हात थंडगार प्रवासाची खास व्यवस्था करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेला ‘शीतल’ बससेवेचा उपक्रम ऐन उन्हाळ्यात कचऱ्याच्या डब्यात गेला आहे. या बसमधील काचेच्या खिडक्या उघडण्याची व्यवस्था असल्याने आतील गारवा टिकून राहत नाही. कंपनांमुळे वातानुकूलीन यंत्रणा वारंवार बंद पडते, शिवनेरीच्या तुलनेत ‘शीतल’ बसची आसन व्यवस्था आरामदायी आणि वातानुकूलित यंत्रणा प्रभावी नसल्याने वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरविली. परिणामी, नाशिक-मुंबई मार्गावरील ‘शीतल’ बससेवा बंद करणे भाग पडले असून नाशिक-पुणे मार्गावरही ही सेवा अखेरच्या घटका मोजत आहे. राज्यातील इतर मार्गावर चालणाऱ्या या बसेसची वेगळी स्थिती नाही.
नाशिकसह राज्यातील इतर प्रमुख महानगरे वातानुकूलित बससेवेने परस्परांशी जोडण्यावर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने गतवर्षी नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा वेगाने विस्तारणाऱ्या शहरांबरोबर मुख्यमंत्र्यांचे कराड, उपमुख्यमंत्र्यांचे बारामती, लातूर, सातारा, कणकवली अशी काही राजकीयदृष्टय़ा प्रबळ शहरे शीतल बससेवेने मुंबईशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी महामंडळाने खास वातानुकूलित बसेसची खरेदी केली. नाशिक-मुंबई शीतल बससेवेला ऑगस्ट २०१३ मध्ये दिमाखात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लगोलग नाशिक-पुणे या सर्वाधिक प्रवासी संख्या असणाऱ्या मार्गावरही शीतल बससेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बसेसची संख्या वाढविण्याचे नियोजन होते. निमआराम बस प्रवासाला लागणाऱ्या भाडय़ात काही अंशी अधिक पैसे तसेच महामंडळाच्या शिवनेरी आणि खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या वातानुकूलित बसच्या तुलनेत बरेच कमी भाडे असे शीतल बसचे वैशिष्टय़ सांगण्यात आले. आकर्षक रंगसंगती व थंडगार हवा यामुळे ‘शीतल’ शिवनेरीच्या ‘व्हॉल्व्हो’शी साधम्र्य साधणारी ठरेल, असे महामंडळाचे गृहीतक होते. परंतु, काही विचित्र कारणांमुळे ही बससेवा अडचणीत आली आहे.
नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे या मार्गावर प्रारंभीच्या टप्प्यात तीन शीतल बसेसच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर बसमधील दोष समोर येऊ लागले. शिवनेरीतील थंडगार व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘शीतल’मध्ये येत नाही अशी प्रवाशांची सार्वत्रिक प्रतिक्रिया. या कारणास्तव एकतर प्रवाशांनी निमआराम नाही तर शिवनेरी बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आणि शीतल बसचा मार्ग कुंठित झाला. नाशिक-मुंबई मार्गावर निमआराम बससेवेबरोबर शीतलचा उपलब्ध झालेल्या पर्यायाला प्रवाशांची पसंती मिळाली नाही. नाशिकमधून प्रत्येक तासाला एक याप्रमाणे नाशिक-दादर अशा निमआराम बस धावतात. या व्यतिरिक्त, नाशिक-मुंबई सेंट्रल, नाशिक-मंत्रालय अशा काही बसेसही उपलब्ध आहेत. शीतलला प्रवासी न मिळाल्याने आणि बसची वातानुकूलित यंत्रणा नियमितपणे काम करीत नसल्याने या मार्गावरील तिची सेवा बंद करण्यात आली. नाशिक-पुणे मार्गावर शिवनेरी (व्हॉल्व्हो) आणि शीतल या दोन वातानुकूलित सेवा सुरू आहे. शिवनेरीच्या वातानुकूलित प्रवासाला ५५० रुपये भाडे आहे. शीतलचे भाडे ४०० रुपये असून तिची वातानुकूलित यंत्रणा कधी सुरू असेल आणि कधी बंद यावर तिचा दररोजचा प्रवास अवलंबून असतो. यामुळे या मार्गावरील शीतल बससेवाही रडतखडत सुरू आहे.
महामंडळाने प्रारंभी पुणे-मुंबई, कराड-मुंबई या मार्गावर शीतल बससेवा सुरू केली होती. त्या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे राज्यातील इतर प्रमुख महानगरे मुंबईशी वातानुकूलित बस सेवेने जोडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात, ज्या राजकीय नेत्यांकडे जनसामान्यांचा अधिक ओढा आहे, त्यांच्या भागातील प्रवाशांना ही सुखद व आरामदायी सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा