पालिका शाळेच्या हलगर्जीपणामुळे पहिलीत शिकणारा एक मुलगा चक्क शाळेतूनच हरवला. कुलाबा येथे सोमवारी ही घटना घडली. नियोजित वेळेच्या एक तास आधीच शाळा सोडून देण्यात आली आणि पालकांची वाट न बघता या मुलाला इतर मुलांसमवेत बाहेर पाठवून दिले. तर ठरलेल्या वेळेवर आलेल्या पालकांनी मुलाचा दिवसभर शोध घेतला. सुदैवाने एका बीट मार्शलला तो सापडला आणि अनर्थ टळला.
मोलमजुरी करणारे कांबळे दांपत्य..कफ परेडच्या शिवशक्ती नगरमध्ये राहणारे. दोनच दिवसांपूर्वी गावाहून परतले आणि ५ वर्षांच्या हणमंताचे नाव कुलाबा येथील पालिका शाळेत पहिलीच्या वर्गात घातले. सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. शाळा दुपारी साडेबारा वाजता सुटेल, असे सांगितले होते. त्यामुळे हणंमताला आणण्याची जबाबदारी मोठय़ा मुलाला देऊन कांबळे दांपत्य रोजंदारीवर गेले. मोठा मुलगा साडेबारा वाजता शाळेत गेला. पण पावसामुळे साडेबाराऐवजी शाळा साडेअकरा वाजताच सोडून देण्यात आली होती. शाळा केव्हाच सुटली, असे शाळेतून दिले दिले. त्यामुळे हणंमताची शोधाशोध सुरू झाली. मुलगा शाळेतून बेपत्ता झाल्याचे ऐकताच हणमंताची आई मरियम्माच्या जीवाची घालमेल सुरू झाली. काम सोडून ती मुलाला शोधण्यासाठी आली. एवढय़ा मोठ्या शहरात आपला छकुला कुठे गेला असेल, या चितेंने रडवेली झालेली मरियम्मा वेडय़ासारखी सर्वत्र हणमंताचा शोध घेत होती. सुदैवाने कुलाबा पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलाला हणमंता सापडला. त्याच्या दप्तरात केवळ एक कोरी वही होती. तो आपला पत्ता सांगू शकत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्या पालकांचा शोध घेता येत नव्हता. त्याचवेळी हणमंताची आई शोधत शोधत कुलाबा पोलीस ठाण्यात आली आणि संध्याकाळी सहा वाजता आई आणि मुलाची भेट झाली.
शाळेत आलेल्या मुलांची जबाबदारी वास्तविक शाळेची असते. शाळा लवकर जरी सोडली तरी पालक येईपर्यंत मुलांना बाहेर सोडायचे नसते. पण शाळेने केलेला हा प्रकार संतापजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही शिकलो नाही, पण मुलाला शिकवावं म्हणून आम्ही त्याला शाळेत घातलं. पण शाळेच्या बेजबाबदारपणामुळे आमचा मुलगा हरवता हरवता वाचला असे हणमंताची आई मरियम्माने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student lost because of school laxity
Show comments