शासकीय निर्णयांची अंमलबजावणी न करता अवैधरीत्या शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा छात्रभारती संघटनेतर्फे देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या शुल्काची एखाद्या महाविद्यालयाकडून मागणी करण्यात येत असल्यास विद्यार्थी व पालकांनी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये ११वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन वर्ष सुरू झाल्यावर महाविद्यालयांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कामुळे दरवर्षी वाद उद्भवत असतो. महाविद्यालयांकडून वेगवेगळी कारणे दाखवून शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी दरवर्षी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतात. प्रवेश प्रक्रियेत सर्व शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याची छात्रभारती संघटनेची तक्रार आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही शिक्षण विभागाकडून नियमांची अंमलबजावणी होत नाही. वर्षभरापासून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना अनेक वेळा निवेदन देऊन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोर्चा काढून अवैध शुल्कासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु त्याविषयी कोणतीही
कार्यवाही झालेली नसल्याचे छात्रभारतीने म्हटले आहे.
शासनाने २७ मे २००३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार १०वीपर्यंत मुलांना आणि १२वीपर्यंतच्या मुलींना मोफत प्रवेश देण्याचे जाहीर केले असतानाही विद्यार्थ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर शुल्क स्वीकारण्यात आले आहे. हे सर्व शुल्क परत करून महाविद्यालयांविरोधात कार्यवाही करण्याची मागणी छात्रभारतीने केली आहे. कॅपिटेशन फी कायद्यान्वये कोणत्याही प्रकारचा विकास निधी घेण्यावर बंदी असताना महाविद्यालयांकडून विकास निधी जबरदस्तीने घेतला जात आहे. माध्यमिक शाळा संहितेनुसार शुल्क निश्चित केले असतानाही सर्रासपणे जादा शुल्काची आकारणी केली जात आहे. हा सर्व प्रकार आर्थिक गुन्हेगारीचा असून त्यास पायबंद घालण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी पार पाडलेली नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
मागील वर्षी शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट आदेश दिलेले असतानाही महाविद्यालयांनी सर्व शुल्क स्वीकारले आहे. या वर्षी छात्रभारतीतर्फे या सर्व घटनांवर लक्ष ठेवून बेकायदेशीर शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. शरद कोकाटे, शहराध्यक्ष राकेश पवार, सागर निकम, विशाल रणमाळे आदींनी दिला आहे. पालक व विद्यार्थ्यांनीही एखाद्या महाविद्यालयाकडून बेकायदेशीररीत्या शुल्काची मागणी करण्यात येत असल्यास  ९४२२५१०५७२, ९३७०४७३३३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader