शहरातील काही महाविद्यालयांमध्ये सर्व शासकीय नियमांची पायमल्ली करून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर शुल्क घेतले जात असून, या महाविद्यालयांविरोधात कोणतीही कार्यवाही शिक्षण विभागाकडून होत नसल्याने आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात छात्रभारतीने दिला आहे.
शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही शिक्षण विभागाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. माहितीपत्रक शुल्क २० रुपये निर्धारित केलेले असताना महाविद्यालयांकडून १२० रुपये घेण्यात आले आहेत. ११ वी, १२ वीच्या मुलींना मोफत प्रवेश देण्याचे शासनाने जाहीर केले असतानाही मुलींकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क घेण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा विकास निधी घेण्यावर बंदी असताना व्ही. एन. नाईक महाविद्यालयाने १५०० रुपयांपर्यंत विकास निधी घेतलेला आहे, असे छात्रभारतीने लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊन तसेच विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा छात्रभारतीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मागण्यांबाबत चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत सर्व माहिती देण्याचे मान्य केले. जिल्ह्य़ातील महाविद्यालयांनी घेतलेले सर्व बेकायदेशीर शुल्क आठ दिवसात परत करण्याचे आदेश देऊन महाविद्यालयावर फौजदारी कार्यवाही करावी, अन्यथा छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा छात्रभारती विद्यार्थी संघटनेमार्फत अॅड. प्रभाकर वायचळे, राकेश पवार, सागर निकम, विशाल रनमाळे आदींनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा